ठाणे: पावसाळ्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी पालिकेने आता हालचाल करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी शहरातील धोकादायक झाडे शोधून काढण्यासाठी सर्व्हेक्षण सुरू केले असून ११० झाडे धोकादायक आढळून आली आहेत. ही झाडे पावसाळ्यापूर्वी निष्कासित केली जाणार आहेत.
तलावांचे शहर म्हणून ओळख असलेले ठाणे शहर वृक्षवल्लीने नटले आहे. मात्र रस्त्याच्या दुतर्फा बारमाही ठाणेकरांना थंड छाया देणारी ही झाडे गेल्या काही वर्षांपासून धोकादायक ठरत आहेत. पावसाळळ्यात तर रोज झाडांची पडझड होऊन शेकडो वाहनांचे नुकसान होत आहे. उन्मळून पडलेल्या वृक्षाखाली आतापर्यंत तीन जणांना जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे शहरात उभ्या असलेल्या धोकादायक वृक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पावसाळ्यात झाडांची पडझड ठाण्यात नित्याचीच झाली असताना दोन दिवसापूर्वी टिकुजिनी वाडी येथे झाडाची फांदी पडून दुचाकीवरून जाणारे दोघे जण जखमी झाले होते. पावसाळ्यात हा धोका वाढण्याची शक्यता असल्याने पालिकेने झाडाचे सर्व्हेक्षण सुरू केले आहे. शहरातील अकराशे झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्याची माहिती वृक्ष प्राधिकरण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ठाणे शहरातील रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या झाडांची मुळे कमकुवत झाली आहेत, त्यामुळेच उन्हाळ्यात देखील झाडे उन्मळून पडू लागली आहेत. ही झाडे परदेशी जातीची असल्याने त्यांची मुळे जमिनीत खोलवर जात नाहीत. देशी झाडांच्या तुलनेत परदेशी झाडे पडण्याचे प्रमाण जास्त असल्याचे पर्यावरणप्रेमी ठाणेकराने ‘ठाणेवैभव’ला सांगितले.
एप्रिल २०२१ ते २५ एप्रिल २०२२ पर्यंत वर्षभरात एकुण ६४६ झाडे उन्मळून पडली आहेत.
वर्षभरातील पडझड
महिना पडलेली झाडे तुटलेल्या फांद्द्या
एप्रिल (२०२१)- २० १४
मे – २८५ ९४
जून – १०१ ५८
जुलै- ११८ ६३
ऑगस्ट- २७ २५
सप्टेंबर- २५ २६
ऑक्टोबर- ०६ १७
नोव्हेंबर- ०६ ०९
डिसेंबर- १० ०९
जानेवारी (२०२२) १० ०९
फेब्रुवारी- ११ ०७
मार्च- १६ १५
एप्रिल- ११ १०