उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 ची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आहे. त्यात 11 प्रभाग वाढल्याने प्रभागाची संख्या 19 वरून 30 झाली असून त्याअनुषंगाने नगरसेवकांची संख्या 78 वरून 89 होणार आहे.
बहुतांश प्रभाग हे 15 ते 18 हजार मतदारांचे असून सर्वाधिक 19 हजार 512 मतदार हे प्रभाग 15 मध्ये आहेत. याच प्रभागाच्या बाजूला असलेल्या प्रभाग 16 मध्ये 12 हजार 399 असे सर्वात कमी मतदार आहेत.
पूर्वीचे प्रभाग हे आजूबाजूच्या प्रभागात समाविष्ट करण्यात आल्याने एकीकडे प्रस्थापितांसाठी आव्हान उभे राहिले आहे.तर गेल्या 5 वर्षांपासून निवडणुकीची तयारी करताना राबवलेल्या उपक्रमांना मासमीडियावर व्हायरल करणाऱ्या तरुण समाज सेवकांसमोर कुणासोबत जायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालिकेने प्रभाग प्रारूप रचना जाहीर केल्यावर 1 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत हरकत आणि सूचना दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.त्या हरकत आणि सूचनांच्या सुनावणीची प्रक्रिया आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर व निवडणूक उपायुक्त प्रियंका राजपूत,विभागप्रमुख मनिष हिवरे यांच्या उपस्थितीत पार पडली आहे.
यावेळेस 30 प्रभागांसाठी निवडणूक होणार आहे.त्यात तीन सदस्यीय सदस्यांचे 29 प्रभाग असून त्यात सरस्वती 17 हजार 069 मतदान आहे.तर केवळ एक प्रभाग हा दोन सदस्यीय असून त्यामध्ये 11 हजार 372 मतदान आहे.
महानगरपालिकेत महिलाराज येणार
2022 च्या पालिका निवडणुकीत 89 नगरसेवक निवडून येणार आहेत.त्या नगरसेवकांत 45 महिला ह्या नगरसेविका असणार असून सर्वसाधारण प्रभागातूनही महिला निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.याशिवाय एक जागा ही एस.टी महिलेसाठी राखीव असल्याने यंदाही पालिकेच्या पटलावर महिलांची संख्या अधिक असणार असे चित्र दिसू लागले आहे.