सहाजण जखमी, वाहतूक खोळंबली
नवी मुंबई: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच आहे. आजही खोपोली एक्झिटजवळ ११ वाहने एकमेकांना धडकली. यात सहा जण जखमी झाले आहेत. अपघातामुळे वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली होती.
मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक ट्रकने ११ वाहनांना धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला. रायगड पोलीस त्याचा शोध घेत आहेत. बोरघाट उतरत असताना ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला असावा अथवा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असावा असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.
सर्व जखमींना खोपोली नगरपालिका रुग्णालयातून उपचार घेऊन डिस्चार्ज झालेले आहेत. त्यापैकी एक जणाला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेमधून रवाना केले आहे. या व्यतिरिक्त कोणीही व्यक्ती जखमी नसल्याची माहिती देण्यात आली आहे. कुंदा सोनवने, कमल सोनवने, हर्षदा घाणेकर, सदानंद भोईर, इलेमा आशु, मॅथ्थू थॉमस अशी जखमींची नावे आहेत. यातील मॅथ्थू थॉमस यांना ससून रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर विचित्र अपघातानंतर वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातात 11 वाहनांचे नुकसान झाले आहे.
मागील काही दिवसांपासून या महामार्गावर अपघाताचं प्रमाण खूपच वाढलं आहे. मागील काही दिवसांतच किमान किरकोळ अपघात धरुन 5 ते 6 अपघात झाले आहेत. ‘हा अपघात झालेल्या ठिकाणी तीव्र उतार आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणारी अवजड वाहने अनेकदा न्यूट्रलवर वाहन चालवतात किंवा त्यांचे ब्रेक फेल होतात आणि अनेकदा मोठी अवजड वाहने संपूर्ण मार्गिका व्यापून घेतात. यावर आता अवजड वाहनांसाठी काही नियम लागू करण्यात यावेत, जेणेकरुन लहान वाहनांनादेखील गाडी चालवण्यासाठी जागा मिळेल. त्यासोबतच वाहनांनी आपला वेगदेखील सांभाळण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी सुचना फलक लावलेले आहेत. तीव्र उताराचे देखील सूचना फलक आहेत, मात्र या सुचना चालकांनी पाळण्याची गरज असल्याचं रस्ते सुरक्षा तज्ञ तन्मय पेंडसे यांनी सांगितले आहे.