ठाणे : मुंब्र्याच्या शिवाजीनगर भागातील पाच मजली इमारतीच्या मीटर रूमला गुरुवारी मध्यरात्री आग लागली. या आगीत तब्बल १०९ मीटर बॉक्स, इलेक्ट्रिक वायरिंग जळून खाक झाली. आगीमुळे इमारतीत धूर पसरल्याने ३०० ते ३५० रहिवाशांना सुरक्षेच्या दृष्टीने बचाव पथकाने बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
शिवाजीनगर येथील अमन हाईट्समध्ये एकूण १०९ सदनिका आहेत. या इमारतीच्या तळ मजल्यावर मीटर रुममध्ये आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी टोरंट पॉवर कर्मचारी, मुंब्रा पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. या आगीत १०९ मीटर बॉक्स व इलेक्ट्रिक वायरिंग जळून खाक झाली. आग लागल्याने इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला. सुरक्षेच्या दृष्टीने अंदाजे ३०० ते ३५० रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. तब्बल पाऊण तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.