जिल्ह्यात १०६ टक्के पाऊस; खरीपाची ८७ टक्के लागवड

ठाणे : जिल्ह्यामध्ये काल २८ जुलैपर्यंत सरासरीच्या १०६ टक्के पाऊस झाला असून खरीपाची सुमारे ८७ टक्के लागवड झाली आहे. जिल्ह्यात या हंगामासाठी सुमारे १३३ टक्के रासायनिक खतांचा पुरवठा करण्यात आला असून जिल्ह्यात खते, बियाण्यांचा पुरेसा पुरवठा करण्यात आला आहे. विविध योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यात १७७ शेतीशाळा सुरु असून ५३१० शेतकरी बांधवाना प्रशिक्षण दिले जात असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी सांगितले.

तालुकानिहाय पावसाचे प्रमाण पाहता ठाणे तालुक्यात ९७ टक्के, कल्याण, ९६ टक्के, मुरबाड ९६.५० टक्के, भिवंडी १०६.६० टक्के, शहापूर १२६.७० टक्के, उल्हासनगर १२३.७० टक्के तर अंबरनाथ तालुक्यात १५६.८० टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कालपर्यंत सुमारे १६५३.५० मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरीच्या १०६.१० टक्के असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

दमदार पाऊस झाल्याने खरीपाची लागवड जवळपास पूर्ण होत आली असून आतापर्यंत जिल्ह्यात ८७ टक्के लागवड झाल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक श्री. वाघ यांनी सांगितले. त्यामध्ये भात ४७ हजार १६९ हेक्टरवर (८५.८८ टक्के) लागवड झाली असून नागली १८२५.५० हेक्टर (७५.८५ टक्के), वरी ९९२.४० हेक्टर (९४ टक्के) तर तूर ४३२७ हेक्टर (१०४.७० टक्के) अशी लागवड झाली आहे.

खरीप हंगामासाठी सुमारे १३३ टक्के रासायनिक खतांचा पुरवठा झाला असून खते, बियाण्यांचा पुरेसा पुरवठा करण्यात आला. जिल्ह्यातील ११२ कृषी सेवा केंद्रांतून खतांची व १२० कृषी सेवा केंद्रांतून बियाणे विक्री केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या सेस फंडातून ८०० क्विंटल भात बियाणे शेतकरी बांधवांना ५० टक्के अनुदानावर देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ५४२ गावामध्ये शेतकरी बांधवानी घरचे नागली व भात बियाणे पेरणीसाठी वापरले असल्याने तीन टक्के मिठाच्या द्रावणाची व जैविकखताची बिजप्रक्रिया करणेचे प्रात्याक्षिके व प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे.

राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून जिल्ह्यातील कमी उत्पादकता असलेल्या गावात भातपिकाचे रत्नागिरी आठ वाणाचे प्रमाणीत बियाणेचे भात पिकांचे पिक प्रात्यक्षिके ५८० हे. क्षेत्रावर राबविण्यात येत असून २३२ क्विंटल बियाणे ५० टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात आले आहे. विविध योजनेंतर्गत जिल्ह्यात १७७ शेतीशाळा सुरु असून ५३१० शेतकरी बांधवाना प्रशिक्षण दिले जात आहे. क्रॉपसप योजनेच्या माध्यमातून भात व नागली पिकावरील कीड, रोग इत्यादी सर्वेक्षण सुरु असून शेतकरी बांधवाना किड/रोग नियंत्रणाबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले जात असल्याचे श्री. वाघ यांनी सांगितले.

जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी बांधवांचा पिक विमा योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून आता पर्यंत एकूण ३१,०४४ शेतकऱ्यांनी भात पिकाचा विमा उतरविला आहे. त्यामाध्यमातून १२,५४३ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी भात पिकाचा विमा काढावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.