ठाणे जिल्ह्यात १०५टक्के घरकुले पूर्ण

ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत ग्रामीण गृहनिर्माण योजनेंतर्गत मुख्यमंत्री यांनी १०० दिवसांचा कृती कार्यक्रम अंतर्गत ठाणे जिल्ह्यात उल्लेखनीय प्रगती करत १०५टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

ग्रामीण गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्याचे संचालक डॉ. राजाराम दिघे यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली ३० डिसेंबर, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत ग्रामीण गृहनिर्माण योजनांसाठी १०० दिवसांची उद्दिष्टपूर्ती मोहीम जाहीर करण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत १३ लाख घरकुलांना मंजुरी, तीन लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित (४५० कोटी), एक लाख घरकुलांचे भौतिकरूपाने पूर्ण बांधकाम, पाच हजार लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देणे उद्दिष्टे दिली गेली होती.

या पार्श्वभूमीवर, ठाणे जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत निर्धारित १६७१ घरकुलांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत १७५७ घरकुले पूर्ण केली, जे प्रमाण १०५टक्के आहे.

या यशामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, गटविकास अधिकारी पंचायत समिती शहापूर नम्रता जगताप, गटविकास अधिकारी पंचायत समिती मुरबाड लता गायकवाड, गटविकास अधिकारी पंचायत समिती कल्याण संजय भोये, गटविकास अधिकारी पंचायत समिती अंबरनाथ पंडित राठोड, गटविकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी गोविंद खामकर, तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी घेतलेल्या परिश्रमांचे फलित स्पष्टपणे दिसून येते. हा उपक्रम प्रशंसनीय आणि प्रेरणादायी असून, अनेक गरजू कुटुंबांना हक्काचे निवासस्थान मिळाले आहे, ज्यामुळे त्यांचे जीवन अधिक सुरक्षित आणि स्थिर झाले आहे.