* रेमंडच्या जमिनीवर उभी राहणार भव्य आणि सुसज्ज इमारत
* निविदा निघाली; ७ ऑगस्टपर्यंत मुदत
ठाणे : ठाणे महापालिकेच्या पाच पाखाडी येथील मुख्यालयाच्या इमारतीला २५ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या इमारतीत अनेक अधिकाऱ्यांना आणि पक्षांनाही कार्यालये उपलब्ध होत नसल्याने रेमंड कंपनीच्या जागेवर आठ एकरावर भव्य आणि सुसज्ज मुख्यालय उभे राहणार असून त्याची निविदाही काढण्यात आली असून या महिनाअखेरीस त्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
ठाणे महापालिकेची स्थापना १९८२ च्या सुमारास झाली. त्यानंतर पाचपाखाडी भागात महापालिकेचे मुख्यालय उभारण्यात आले. तळ अधिक चार मजल्यांची ही इमारत असून या इमारतीला २५ वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्यातही तीन वर्षांपूर्वी या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. या इमारतीत १६ हून अधिक विभागांचे कामकाज चालत आहे. परंतु काळानुरुप शहराची लोकसंख्या वाढली, झपाट्याने नागरीकरण देखील झाले. त्यामुळे महापालिका मुख्यालयाची इमारती कमी पडू लागली आहे. आजही काही अधिकाऱ्यांना किंवा विविध पक्षांसाठी आवश्यक असलेली कार्यालये कमी पडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाढीव बांधकाम करुन काही केबीन सुरु केल्याचेही दिसून आले आहे. परंतु नव्या महापालिका भवनासाठी तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या काळात प्रयत्न सुरु झाले होते.
नवीन मुख्यालायासाठी ५७२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्य शासन यासाठी १०० टक्के निधी देणार आहे. यातील २५० कोटींचा निधी महापालिकेला प्राप्त झालेला असून उर्वरित खर्च सुद्धा उपलब्ध व्हावा यासाठी पालिकेने राज्य शासनाकडे पत्र व्यवहार सुरू केला आहे.
दरम्यान या कामाची निविदा निघाली असून २७ ऑगस्टपर्यंत त्याची मुदत आहे. त्यानंतर ठेकेदार अंतिम करून प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.