ठाणे : महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळसंयोजनाचे थकीत देयक चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये 100 टक्के सूट लागू करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी आज दिली.
ही योजना 1 सप्टेंबर 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत लागू राहील. वरील योजनेचा लाभ घेऊन थकीत व चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरुन त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये 100 टक्के सूट / सवलत योजनेचा लाभ नागरिक घेऊ शकतील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बील धारकांनी पाणीपुरवठा देयके जमा केली असतील अशांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही. तसेच ही योजना व्यवसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही.
जे नागरिक 1 एप्रिल 2025 आपली थकबाकीची रक्कम प्रलंबित ठेवणाऱ्या खातेदारांवर जप्ती कारवाई तत्काळ प्रस्तावित करुन संबंधिताचे नळ संयोजन खंडीत करणे, मिटर रुम सिल करणे व पंप जप्ती अशी कारवाई होईल, असे आयुक्त यांनी यावेळी नमूद केले. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावधी होणेसाठी प्रभाग समिती स्तरावर माहिती फलक लावण्यात यावेत व सदर योजना प्रभावीपणे राबवावी अशी सूचना आयुक्तांनी केली आहे.
या योजनेचा लाभ जास्तीत नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी केले आहे.