दीड दिवसात १० टन निर्माल्य; ४०० किलो अजैविक कचरा

Thanevaibhav Online

22 September 2023

ठाणे: दीड दिवसाच्‍या गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे १० टनाहून अधिक निर्माल्‍य संकलित झाले आहे. या निर्माल्‍यावर प्रक्रिया करून त्‍याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. तसेच निर्माल्‍यातील अविघटनशिल घटकांचे वर्गीकरण करून ते पुर्नप्रक्रियेसाठी पाठवण्‍यात येणार आहेत.

ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्‍यासपीठ गेली १२ वर्षे गणेशोत्‍सव काळातील निर्माल्‍य व्‍यवस्‍थापन करीत आहे. त्यात रोटरी क्‍लब ऑफ ठाणे गार्डन सिटी तसेच प्रकल्‍प पुर्ननिर्माणचे सदस्‍य मदत करतात.

यावर्षी अविघटनशिल घटक जसे की, प्‍लास्‍टीक, थर्मोकोल यांचे निर्माल्‍यातील प्रमाण लक्षणियरित्‍या कमी झाले आहे. आतापर्यंत केवळ ४ टक्‍के म्‍हणजे ४०० किलो अजैविक कचरा गोळा झाला आहे.

दरम्यान बुधवारी महापालिका क्षेत्रात दीड दिवसांच्या १३९५५ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. ठाणे महापालिकेच्या वतीने शहरात दीड दिवस, पाच दिवस आणि सार्वजनिक गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेतंर्गत रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन पालायदेवी, निळकंठ वुड़्स टिकुजीनी वाड़ी-बाळकुम रेवाळे, खारेगाव आदी ठिकाणी एकूण १५ कृत्रिम तलावांची व्यवस्था महापालिकेने उपलब्ध करुन दिली आहे. तर पारसिक रेती बंदर अणि कोलशेत बंदर याबरोबरच मिठबंदर, कळवा, गायमुख आदी सात ठिकाणी विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावर ही गणेश मूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर, महापालिका क्षेत्रात एकूण ४२ ठिकाणी विसर्जनासाठी विशेष टाकी व्यवस्था तयार करण्यात आली आहे.