राजकीय हस्तक्षेपामुळे ठाण्यात ओबीसींना १० टक्के आरक्षण

जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

ठाणे : ठाणे महापालिकेच्या १४२ जागांमध्ये आता फक्त १४ जागा ओबीसीला मिळणार आहेत, देशभरात ओबीसीची लोकसंख्या ५४ टक्के असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रात ५२ टक्के मग महापालिकेत १० टक्के कशावरुन असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार तथा माजी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. इथल्या राजकीय हस्तक्षेपामुळे आणि ठाणो महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पालिकेतच बसून १० टक्के आरक्षण ठोकून देत समाजावर अन्याय केल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाण्यातील माळी समाज संस्थेच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार व विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या बांधवांना यावेळी गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते,ओबीसी आरक्षण जाहीर झाले आणि ठाणे महापालिकेत त्याचे परिणाम दिसून आले आहे. महापालिकेत त्यांना केवळ १० टक्केच आरक्षण मिळाले आहे, त्यावर आव्हाड यांनी बोट ठेवले आहे. ठाण्यात ओगरी,कोळी समाज आहे, त्यांची संख्या निश्चितच जास्तीची आहे, त्यामुळे जे काही सर्वेक्षण झालेले आहे, ते चुकीच्या पध्दतीने झाले असून हा समाजावर अन्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता सगळ्यांनी मागणी केली पाहिजे देशात, महाराष्ट्रात ओबीसींची लोकसंख्या किती, त्यांच्या सर्वेक्षणाचे काम सरकारने हाती घेतले पाहिजे म्हणजे दुध का दुध आणि पानी का पानी होऊन खरी टक्केवारी सर्वाना समजेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. ओबीसीचे आरक्षण जात होते, त्यावेळेस किती लोक रस्त्यावर यायाला तयार होते? यात केवळ लढणारी लोक पुढे येतात, बाकीचे लोक घरी बसतात अशी परिस्थिती दिसून आली होती, अशी टिकाही त्यांनी केली.

याप्रसंगी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, माळी समाज संस्थेचे अध्यक्ष सचिन शिंदे, नगरसेवक संजय वाघुले, भरत चव्हाण, नम्रता कोळी,शेठ नानजी ठक्कर, परिवहन समिती सदस्य विकास पाटील, माळी समाज संस्थेचे कार्याध्यक्ष सचिन केदारी, निलेश शेंडकर, बाळासाहेब भुजबळ, डाॅ.कारभारी खरात, राहुल पिंगळे, धर्मेद्र वाघुले, प्रभाकर राऊत, जयश्री रामाणे, नीता कलोरे, दशरथ साबळे, कृष्णा भुजबळ, रमेश खामकर, शिवाजी पिंगळे, गणेश थोरात, स्वप्नील वाघुले, चेतन बटवाल, लोकेश घोलप, गणेश डोके, विश्वनाथ थोरात आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव नवनीत सिनलकर यांनी केले.