ठाणे: शहरातील नालेसफाई ८० टक्के झाल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी, उथळसर प्रभाग समितीच्या हद्दीतील नाल्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदाराला एक-दोन नव्हे तर दहा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
अंतर्गत येत असलेल्या नाल्यांची सफाईला म्हणावा तसा वेग येत नसल्याने अखेर संबंधित ठेकेदाराला पालिका प्रशासनाच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नाल्यांची पूर्णपणे सफाई न झाल्यास संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. नऊ प्रभाग समितीच्या अंतर्गत एकत्रच ही कामे सुरु करण्यात आली असून यासाठी ९ प्रभाग समिती अंतर्गत ९ स्वतंत्र ठेकेदारांची नियुक्त करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला संपूर्ण ठाणे शहरात ८० टक्के नालेसफाई झाली असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांकडून नालेसफाईबाबत माहिती देताना असमन्वय दिसून आला होता. त्यानंतरच पालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांनी सर्व स्वच्छता उपनिरीक्षकांची बैठक बोलावून नालेसफाईचा आढावा घेतला होता. इतर प्रभाग समितीचे काम समाधानकारक असल्याचे बोलले जात आहे तर उथळसर प्रभाग समितीच्या नालेसफाईच्या संदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
या प्रभाग समितीच्या अंतर्गत येणाऱ्या नाल्यांची सफाई ही संथगतीने सुरु असून नाल्यात चक्क गाद्या, सोफासेट असे मोठ्या प्रमाणात सामान टाकण्यात आल्याने सफाईसाठी विलंब होत असल्याचा खुलासा संबंधित स्वच्छता उपनिरीक्षकांकडून करण्यात आला होता. अखेर यासंदर्भात संबंधित ठेकेदाराला पालिका प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली असून यामध्ये चार नोटीसा कार्यकारी अभियंता यांच्याकडून बजावण्यात आल्या असून सहा नोटीसा स्वच्छता उपनिरीक्षकांकडून बजावण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.