भिवंडीत आठवड्यात १० अल्पवयीन मुले बेपत्ता

बेपत्ता मुलींचे प्रमाण जास्त

भिवंडी: भिवंडीत अल्पवयीन मुलांचे बेपत्ता होण्याचे आणि अपहरणाचे प्रमाण वाढले आहे. मागील सात दिवसांत येथून १० अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत. त्यामध्ये बहुतेक मुलींचा समावेश आहे.

पोलिस मुलांच्या अपहरणाचे गुन्हे नोंदवतात. पण त्यांना शोधण्यात पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे. पोलिसांच्या मूकदर्शकाच्या भूमिकेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुले बेपत्ता झाल्याच्या तक्रारीनंतर त्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो असे पोलिसांचे म्हणणे असले तरी देखील बहुतेक मुले काही ना काही कारणास्तव स्वतःहून घरातून पळून जात असल्याचे समोर येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांती नगर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सागर प्लाझाजवळ राहणारी १४ वर्षांची अल्पवयीन मुलगी २२ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता घराबाहेर पडली, ती घरी परतलीच नाही. तिच्या कुटुंबीयांनी अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. त्याचप्रमाणे, २१ एप्रिल रोजी निजामपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चाळीत राहणारी १७ वर्षीय मुलगी सकाळी ६ वाजता बाथरूमला जाण्यासाठी घराबाहेर पडली, पण ती परतलीच नाही. तिच्या कुटुंबीयांनी निजामपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की, त्याचप्रमाणे, नागाव येथील गायत्री नगर येथील चाळीत राहणारी १२ वर्षांची मुलगी शनिवार, १९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता कोणालाही न सांगता घराबाहेर पडली आणि परतलीच नाही. तिच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की, तिच्या तरुण वयाचा आणि अपरिपक्वतेचा फायदा घेऊन एखाद्या अज्ञात व्यक्तीने तिला आमिष दाखवून अपहरण केले. या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

गायत्री नगर परिसरातील १२ वर्षांची मुलगी १९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता अचानक बेपत्ता झाली. मुलगी कोणालाही न सांगता घराबाहेर पडली आणि परतलीच नाही. या आठवड्यात तीन दिवसांत ५ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत, तर गेल्या आठवड्यात चार दिवसांत सहा अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. शहरात अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे स्थानिक पालकवर्ग चिंतेत आहेत.

१४ एप्रिल रोजी भिवंडी शहर पोलीस स्टेशन परिसरात मुन्नी शफीक खान नावाची १४ वर्षांची मुलगी तिच्या घरातून बेपत्ता झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी पीएसआय विशाल पवार यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले आणि त्यांना मुलीला शोधण्याची जबाबदारी सोपवली. पथकाने मुलीला सुरक्षित शोधून तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी सांगितले की, मुलगी एका मशिदीजवळ आढळली. घरातील कामे करायला लावल्याबद्दल तिच्या कुटुंबावर रागावल्याने ती पळून गेली होती.

पोलिस उपायुक्त मोहन दहिकर म्हणाले की, मुली बेपत्ता होण्यामागे प्रेमप्रकरण, सोशल मीडियाचा अति वापर आणि पालकांचे दुर्लक्ष ही प्रमुख कारणे दिसून येत आहेत. शहरात मुली बेपत्ता होण्याच्या घटना खूप कमी आहेत. भिवंडीचे पोलिस उपायुक्त म्हणाले की, पालकांनी त्यांच्या मुलांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांच्याशी प्रेमाने आणि समजूतदारपणे वागणे आणि मुलांशी सुसंवाद साधणे महत्त्वाचे आहे. अनेक प्रकरणांमध्ये, मुलांशी संवादाचा अभाव असतो आणि समुपदेशनादरम्यान असा अंदाज येतो की मुलांकडून सोशल मीडिया आणि मोबाईलचा जास्त वापर केल्यामुळे अशा घटना घडत आहेत. जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या वागण्यात काही बदल दिसले तर त्यांना विश्वासात घेणे आणि त्यांच्याशी चर्चा करणे महत्वाचे आहे. पालकांनी स्वतः पुढाकार घ्यावा. त्यांचे मित्र बनले पाहिजे आणि त्यांच्या जीवनाकडे लक्ष दिले पाहिजे,असे त्यांनी सांगितले.