सीसीटीव्हीसाठी खोदलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी १० कोटी

अंबरनाथ नगर परिषदेकडून निविदा

अंबरनाथः अंबरनाथ शहरात गेल्या काही महिन्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी विविध भागात भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. हे खोदकाम आता पूर्ववत करण्यासाठी अंबरनाथ नगर परिषदेने १० कोटी रूपयांची निविदा जाहीर केली आहे.

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने राज्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळ निर्माण करण्याचे काम हाती घेतले होते. या कामासाठी विविध शहरांमध्ये भूमिगत वाहिन्या टाकण्यात आल्या. अंबरनाथ शहरातही या प्रकल्पाचे काम करण्यात आले. अंबरनाथ शहरात सुमारे २५० कॅमेरे बसवण्यात येणार होते. त्या अंतर्गत शहराच्या विविध भागांमध्ये खोदकाम करण्यात आले. रस्त्याच्या कडेला, रस्त्यांच्या मधून, विविध भागात हे खोदकाम करण्यात आले.

हे काम करत असताना संबंधित कंत्राटदाराने बेजबाबदारपणे काम केल्याचा आरोप केला जात होता. खोदकाम करताना चांगले रस्तेही खोदण्यात आले. काही ठिकाणी खोदकाम करताना वीज वाहिन्या, जल वाहिन्यांची तपासणी केली गेली नाही. परिणामी वीज वाहिन्या, जलवाहिन्या फुटून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. तर यंत्रणांनाही आयत्या वेळी काम करून वीज आणि पाणी पुरवठा सुरळीत करावा लागला होता. त्यामुळे या कामाचा फायदा होणार असला तरी खोदकामातील बेजबाबदारपणामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण होते.

आता हे खोदकाम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी खोदलेल्या रस्त्याच्या भागाला पूर्ववत करण्याची गरज आहे. त्यासाठी अंबरनाथ नगर परिषदेच्या वतीने १० कोटी २१ लाख ७७ हजार रूपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे. रस्त्यांची दुरूस्ती करून रस्ते पूर्ववत करणे यात अपेक्षित आहे. तर येत्या सहा महिन्यात हे काम करणे अपेक्षित आहे. मात्र पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या पावसामुळे या कामात अडचणी येण्याची भीती व्यक्त होते आहे.