दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार या दोन्ही इयत्तांच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा १६ जूनपासून सुरू होणार आहेत.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १०वी) या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेले व अपेक्षित गुण न मिळालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार करण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ही परीक्षा इयत्ता दहावी व बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तातडीने घेण्यात येत आहे. त्यामुळे पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होऊन विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेऊ शकतात. त्यानुसार इयत्ता बारावी व दहावीची परीक्षा लेखी व प्रात्याक्षिक परीक्षा १६ जूनपासून सुरू होत आहे. इयत्ता बारावीची परीक्षा १६ जून ते ८ जुलै या कालावधीत होणार असून इयत्ता दहावीची परीक्षा १६ ते ३० जून या कालावधीत होणार आहे. या दोन्ही परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडून जाहीर होणारे वेळापत्रक अंतिम राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक हे फक्त विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहे.