तलाव नूतनीकरणासह क्रीडा संकुलात टेबल टेनिस, चेस, कॅफेटेरीया आदींची उभारणी
ठाणे: कळवा येथील यशवंत रामा तरण तलावासह क्रीडा सुविधांच्या उभारणीसाठी राज्याच्या नगर विकास विभागाने १० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तरण तलावाच्या नूतनीकरणा बरोबरच क्रीडा संकुलात टेबल टेनिस, चेस, कॅफेटेरीया, डॉरमेटरी यांसारख्या विविध सोयीसुविधा उभारण्यात येणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात खेळाडूंसाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारण्यात आले आहेत. अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, कळवा, दिवा, मुंब्रा या शहरांमध्ये खेळाडूंसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे कायमच आग्रही असतात. त्याच माध्यमातून अंबरनाथ येथे शूटिंग रेंज, क्रीडा संकुल, ऑलिंपिक दर्जाचा तरण तलाव, उल्हासनगर शहरात क्रीडा संकुल, डोंबिवलीत क्रीडा संकुल, कळवा, मुंब्रा आणि दिवा या शहरांमध्ये खेळाडूंसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा येथे यशवंत रामा तरण तलाव आणि क्रीडा सुविधा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीला प्रतिसाद देत राज्याचे नगर विकास विभागाने यशवंत रामा तरण तलाव नूतनीकरणासह इतर क्रीडा सुविधा उभारण्यासाठी तब्बल १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्याच्या नगर विकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला.
“महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांचा विकास” या योजनेअंतर्गत हा निधी वितरीत करण्यात आला आहे. या प्रकल्पा अंतर्गत कामांसाठी कार्यान्वयन यंत्रणा “महानगरपालिका” राहील. या एकूण कामासाठी आवश्यक खर्च राज्य शासन आणि ठाणे महापालिका यांच्या भागीदारीतून होईल. यात प्रकल्प खर्चाचा ७५ टक्के हिस्सा राज्य शासनाचा तर २५ टक्के हिस्सा महानगरपालिकेचा राहील. हा निधी उपलब्ध झाल्याने लवकरच यशवंत रामा तरण तलाव आणि क्रीडा संकुलात इतर सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाबद्दल क्रीडा प्रेमी आणि खेळाडूंनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत.
या सुविधांची होणार उभारणी
– तरण तलावाचा डेक ( आजूबाजूचा ) परिसर उत्तम दर्जाच्या टाईल्स लावून नव्याने करण्यात येणार
– ऑलिंपिक दर्जाचा तलाव असल्याने ‘ डायव्हिंग सुविधा ‘ उभारणार
– खेळाडूंसाठी स्वतंत्र शौचालय
– क्रीडा संकुलात टेबल टेनिस, चेस खेळण्याच्या सुविधा
– विविध इंडोर खेळांच्या स्पर्धेसाठी एक भव्य हॉल ची उभारणी
– संकुलात उत्तम असा कॅफेटेरीया
– देशभरातून येणाऱ्या खेळाडूंसाठी शयनगृह