ठामपाची कारवाईची घोषणा हवेत विरली
ठाणे : शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी रस्त्यावरून राडारोडा वाहून नेणाऱ्या डंपरवर कारवाई करण्याची घोषणा करणाऱ्या ठाणे महापालिकेने आता विकासकांकडून तसेच शहरातील नागरिकांकडून रस्त्यावर टाकले जाणारे डेब्रिज आणि इतर बांधकाम कचरा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिका तब्बल एक कोटी ४० लाख रुपये खर्च करणार आहे.
प्रदूषण करणाऱ्यांवर लक्ष ठेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने भरारी पथक तयार करण्यात आले आहेत. या भरारी पथकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात राडारोडा वाहून नेणाऱ्या डंपरवर कारवाई करण्यात आली आहे. शहराच्या बाहेरून राडारोडा वाहून आणणाऱ्या डंपरला स्कॅन कोड देखील बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र आता रस्त्यावर पडणारे बांधकाम साहित्य, डेब्रिज आणि इतर कचरा ठाणे महापालिकाच उचलणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रभाग समिती अंतर्गत रस्त्यांची पहाणी करण्यात आली आहे.
यामध्ये अनेक ठिकाणी नागरीकांमार्फत घरांचे दुरुस्ती तसेच बांधकाम करण्याकरिता काढण्यांत येणारे डेब्रिज रस्त्यावर, फुटपाथवर टाकण्यांत येत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रस्ते विद्रुप अस्वच्छ दिसत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा दाखला देत बांधकाम साहित्य, कचरा रस्त्यावर व तसेच रस्त्याच्या कडेला असलेले साहित्य कचरा उचलणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
ज्या रस्त्यांची पाहणी करण्यात आली आहे ते रस्ते दैनंदिन वर्दळीचे असून नागरीकांना तसेच वाहनांना चालण्यास अडथळा निर्माण होत असल्याचा दावा पालिकेचा दावा आहे. त्यामुळे प्रभाग समितीनिहाय रस्त्यावरील डेब्रिज उचलण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. प्रभाग समितीनिहाय रस्त्यावरील डेब्रिज उचलणे व इतर अनुषंगिक कामे करणे या हेडखाली एकूण एक कोटी ४० लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
प्रभाग समितीहीनय तरतूद
प्रभाग समिती खर्च
नौपाडा-कोपरी १५ लाख
माजिवडा-मानपाडा १५ लाख
वागळे १५ लाख
दिवा २० लाख
उथळसर १५ लाख
कळवा १५ लाख
वर्तकनगर १५ लाख
मुंब्रा १५ लाख
लोकमान्य-सावरकरनगर १५ लाख
एकूण १ कोटी ४० लाख