विशाळगडावरील घटनेनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांची संतप्त प्रतिक्रिया
ठाणे: खऱ्या शिवभक्तांनी कधीच मशिदी किंवा घरे तोडून त्या ठिकाणी सोने लुटण्याचे काम केले नसते. मात्र विशाळ गडावर जी घटना घडली त्यावरून अशाप्रकारचा हिंसाचार करणारे हे शिवभक्त नाहीत तर हे दरोडेखोर असल्याची संतप्त प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
विशाळगडावर काही तरी लफडं होणार असा अंदाज मुस्लिम बांधवांना होता, त्यामुळे या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात यावा यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देऊनही या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला नाही, असा आरोप देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
सोमवारी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी विशाळगडाच्या परिसरात हिंसक जमावाने केलेल्या तोडफोडीमुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र, जमावाने केलेल्या हिंसाचारामुळे या मुद्द्याला वेगळेच वळण लागले होते. या सगळ्यावरुन वाद सुरु असताना यावर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला देखील त्यांनी उत्तर दिले. शिवसेनेचे हिंदुत्व कोणच काढून घेऊ शकत नाही, प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडून ते हिंदुत्व आले असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर केलेल्या सलगी संदर्भातील देवेंद्र फडणवीस यांना देखील उत्तर दिले आहे. राष्ट्र्वादीसोबत युती करा किंवा सलगी करा नाही तर काही करा, आम्हाला काही करायचे नाही, बंद दाराआड काहीही होऊ शकते असे आव्हाड यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीसंदर्भात शरद पवार कोणाशी कधीही भेटू शकतात. जाती-धर्माच्या पलीकडे आणि मानव हिताचे राजकारण ते करतात. म्हणून ते अजूनही देशाच्या राजकारणातील केंद्रबिंदू असल्याचे आव्हाड म्हणाले.
अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे नावच बदलले असून या योजनेचे नाव माझी लाडकी योजना असे केले आहे. अजित पवार यांची ती सवयच आहे. मी जे करेन तेच, अशी त्यांची नेहमीची भूमिका असून आता बारामतीवरून निरोप आल्यानंतर ही रक्कम वाढवण्यातही येईल. त्यांना पैसेच वाटायचे आहेत, असा टोला देखील आव्हाड यांनी लगावला.
एवढे कारखाने गुजरातला गेले, महाराष्ट्रात जी कामे सुरु आहेत त्यात केवळ ३१ टक्के मराठी कामगार आहेत. त्यामुळे मराठी माणसाला मुंबईतून संपवण्याचा डाव आहे, माझ्याकडे डेटा आहे, असा आरोप यावेळी आव्हाड यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा समाचार देखील त्यांनी यावेळी घेतला. उपमुख्यमंत्र्यांची ही भाषा आहे का? त्यांच्याकडे पोलीस खाते आहे, उद्या फिरणेही कठीण होईल. लोकसभेच्या निकालानंतर ते पिसाळलेले असल्याने अशा प्रकारची विधाने ते करत आहेत. मात्र दोन महिन्यांनंतर त्यांचा पराभव अटळ असल्याचे आव्हाड म्हणाले.