डोंबिवली : मध्य रेल्वेच्या मोठ्या प्रमाणात गर्दीचे आणि महसूल उत्पन्नाचे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली रेल्वेच्या फलाट क्रमांक दोनवरील आणि मुख्य पुलावरील स्वयंचलित जिन्याचे उद्घाटन प्रवाशांनीच केले.
पूर्वी दोन स्वयंचलित जिने रेल्वे प्रशासनाने बांधले आहेत. परंतु स्मार्ट रेल्वे स्थानक म्हणून सुधारणा होणाऱ्या या डोंबिवलीच्या रेल्वे स्थानकात प्रथमच स्वयंचलित जिन्यातून एका बाजूला फलाटावर उतरण्याची तर दुसऱ्या बाजूला रेल्वे पुलावर येण्याची सोय केली आहे. आज मंगळवारी या स्वयंचलित जिन्याने चढण्या-उतरण्याचा प्रवाशांनी आनंद घेतला.
डोंबिवली पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या मुख्य पुलावर येण्यासाठी स्वयंचलित जिन्याची सोय केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून नवीन स्वयंचलित जिन्याचे काम सुरु होते. जिना सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने याबाबत ट्रायल घेतली होती. मंगळवारी सकाळी स्वयंचलित जिना सुरु असल्याचे पाहून प्रवाशांनी जिन्याचा वापर सुरु केल्याची माहिती डोंबिवली रेल्वे स्टेशन प्रबंधक ज्ञानेद्रकुमार शाहू यांनी दिली.
काही वर्षांपूर्वी डोंबिवली रेल्वे स्थानकातील पूर्वेकडील स्वयंचलित जिन्याचे उद्घाटन माजी मंत्री गणेश नाईक आणि माजी खासदार आनंद परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. उद्घाटन सुरु असताना रेल्वे पुलावर नागरिकांची प्रचंड गर्दी होती. मात्र मंगळवारी सुरु केलेल्या स्वयंचलित जिन्याचे उद्घाटन कोणत्या नेते मंडळींच्या हस्ते होईल याची प्रतीक्षा न पाहता प्रवाश्यांनी जिन्याचा वापर सुरु केला. अगदी शांतपणे सुरु झालेल्या जिन्याचा वापर होताना पाहून प्रवासी वर्गही समाधानी दिसले. आता अशाच पद्धतीने सर्व स्वयंचलित जिने रेल्वे प्रशासनाने करावे, अशी मागणीही काही प्रवाशांनी केली.