ठाणे : महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी तसेच कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डाॅ. योगेश शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर डाॅ. राकेश बारोट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या सुसज्ज प्रसुती कक्ष आणि शस्त्रक्रीया विभागाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान रुग्णालयातील डाॅक्टरांच्या वसतीगृहाच्या दुरावस्था असल्याची बाब मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आली होती. याशिवाय, तेथील महिला डाॅक्टरांनी या दुरावस्थेसह त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या तक्रारीही मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केल्या होत्या. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानंतर आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीने रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठता डाॅ. योगेश शर्मा आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.
डाॅ. योगेश शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर डाॅ. राकेश बारोट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीचा आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी काढला आहे.