जितेंद्र आव्हाड यांचा परिवहन मंत्री सरनाईक यांना मित्रत्वाचा सल्ला
ठाणे: कोणत्याही वादात पडू नकोस, तू आणि मुख्यमंत्री असा मार्ग सरळ करून ठेव म्हणजे सर्व काही व्यवस्थित होईल, असा मित्रत्वाचा सल्ला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिला आहे.
१५ ते १६ वर्षांपूर्वी एकेकाळी खास मित्र असलेले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि जितेंद्र आव्हाड हे रविवारी उपवन फेस्टिवल निमित्त एकाच व्यासपीठावर आले. यावेळी दोघांनीही मैत्रीचे जुने धागे उलगडले.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपवन येथे संस्कृती आर्ट फेस्टिवलचे आयोजन केले आहे. ११ वर्षांपासून होत असलेल्या या फेस्टीवलसाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना सरनाईक यांनी आमंत्रण दिले होते. ते स्विकारत आव्हाड यांनी रविवारी या फेस्टिवलला उपस्थिती लावली. त्यामुळे हे दोन्ही नेते या फेस्टिवलच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर दिसले. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी एकमेकांचे भरभरून कौतुक देखील यावेळी केले.
मी आणि जितेंद्र असे आम्ही दोघे लहानपणापासून मित्र आहोत. विद्यार्थी संघटनेपासून आम्ही एकत्र काम केले. आज जितेंद्र आव्हाड माजी मंत्री आहेत आणि मी आजी मंत्री आहे. भविष्यात ते आजी मंत्री होवोत, अशी अपेक्षा करतो’, अशा शुभेच्छा सरनाईक यांनी आव्हाड यांना दिल्या. तर, आव्हाड यांनीही सरनाईक यांचे कौतुक करत त्यांना मित्रत्वाचा सल्ला यावेळी दिला. ‘गेली ३५ वर्षे मी आणि सरनाईक एकत्र आहोत. कधी लांब गेलो. कधी जवळ आलो. लांब मात्र एकदाच गेलो पण, जवळ मात्र कायम राहिलो. त्याचे कारण म्हणजे आमची माऊली प्रताप सरनाईक यांची पत्नी परिषा सरनाईक या आहेत. सरनाईक हे खूप संघर्ष करून मोठे झाले आहेत. कष्टाने जेव्हा यश मिळते ना, तेव्हा यशाची किंमत कळते. कर्तृत्वाने आणि कष्टाने लखलखाट होतो, तो पाहताना आनंद होतो. त्यामुळेच सरनाईक यांना मंत्री पद मिळाले, ही माझ्यासाठी आनंददायी बाब आहे. कोणत्याही वादात तू पडू नकोस. तू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा मार्ग सरळ करून ठेव म्हणजे सगळे व्यवस्थित होईल, असा मैत्रीचा सल्ला आव्हाड यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना यावेळी दिला.