उमनपात स्थायी समितीसह नऊ विषय समित्या गठीत 

शिवसेना-भाजपात खडाजंगी

उमनपात स्थायी समितीसह नऊ विषय समित्या गठीत

उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत डम्पिंग ग्राउंड, वालमेनच्या बदली आणि धोकादायक इमारतीच्या मलब्यावरून झालेल्या जबरदस्त खडाजंगीत शिवसेना आणि भाजपाने आज स्थायी समितीच्या सोळा सदस्यांची निवड केली आहे.

आज महापालिकेच्या सभागृहात महापौर अश्विनी निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महासभेत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा अभिनंदनाच्या ठरावावर चर्चा सुरु असताना मध्येच भाजपाचे टोनी सिरवानी, नगरसेवक शंकर लुंड यांनी कॅम्प पाच येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये आग लागल्याने त्यातून निघणाऱ्या, विषारी धुरामुळे तेथील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाल्याचा मुद्दा उपस्थित केल्याने शिवसेना आणि भाजपामध्ये चांगलीच खडाजंगी झाली. मनपा आयुक्तांनी बदली केलेल्या वालमेनच्या प्रश्नावर तसेच धोकादायक इमारतीमधून निघणारा मलबा या मुद्द्यावरून सेना-भाजपा नगरसेवकांमध्ये चांगलीच जुपंली होती. याशिवाय भाजपा नगरसेवक राजेश वानखडे यांनी शिवसेना गट नेत्याचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला.

महापालिकेत शिवसेना-भाजपा सत्तेत असताना शहराच्या विविध प्रश्नांवर भाजपाकडून शिवसेनेला लक्ष्य करण्यात येत असल्याने दोन्ही पक्षाचे नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

दरम्यान या गोंधळात स्थायी समितीच्या सोळा सदस्यांची निवड करण्यात आली. शिवसेनेच्या वतीने नगरसेवक दिलीप गायकवाड, जमनू पुरस्वानी, डिम्पल ठाकूर महेश सुखारामणी, विकास खरात, जया माखीजा, राजेंद्र सिंग भुल्लर कुलवन्त सोहता, भाजपाच्या वतीने राजेश वधारिया, अर्चना करंकाळ, कविता पंजाबी, टोनी सिरवानी, शंकर लुंड, संजय सिंग, राजेश वानखडे आणि रवी जग्याशी यांची निवड करण्यात आली आहे.

याशिवाय नऊ विशेष समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. यात पाणीपुरवठा, महिला बालविकास, महसूल, सार्वजनिक बांधकाम, शहर नियोजन, स्वच्छता, परिवहन, शिक्षण आदी समित्यांचा समावेश आहे.