अंबरनाथ: पिस्टल आणि परवाना मिळवून देण्याच्या नावाखाली एका बोगस महिला आमदाराने एकाची साडेपाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची खळबळजनक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या फसवणूक प्रकरणी संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेत बोगस आमदार वंदना मिश्रा आणि तिचे दोन सहकारी अभिषेक आणि फिरोज या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पोलिसांनी दिली.
महाराष्ट्र विधानसभेच्या आमदार असल्याचा वाहनावर स्टिकर लावून बोगस आमदार वंदना मिश्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंबरनाथ पश्चिमेला राहणारे अनमोल सिंह (44) यांना पिस्टल आणि परवाना काढून देण्याच्या नावाखाली पाच लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केली होती. वाहनावर आमदार असल्याचे स्टिकर (लोगो) लावून आमदार असल्याचे वंदना मिश्रा यांनी सिंह यांना सांगितले. पिस्टल परवान्याबाबत सिंह यांनी मिश्रा यांच्याकडे विचारणा केली होती. मिश्रा यांनी अभिषेक आणि फिरोज हे दोन जण त्यांचे स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून त्या दोघांचा सिंह यांच्याशी परिचय करून दिला होता.
त्यानुसार सिंह यांनी फेब्रुवारी ते जून 2023 या काळात त्यांच्या कंपनीच्या नावे इन्ड्सन्ड बँकेतून बोगस आमदार मिश्रा यांच्या बँक खात्यामध्ये पाच लाख 20 हजार रुपये जमा केले, मात्र पैसे देऊनही पिस्टल आणि त्याचा परवाना मिळत नसल्याने सिंह यांनी मिश्रा यांच्याकडे पैशांची मागणी केली. तेव्हा धमकवण्यात आल्याचे सिंह यांनी पोलिसांत सांगितले.
फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात येताच बोगस आमदार मिश्रा आणि त्यांच्या दोन स्वीय सहाय्यक यांच्या विरोधात अंबरनाथ पोलिसांत तक्रार दाखल केली. तिन्ही जणां विरोधात अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करून वंदना मिश्रा यांना ताब्यात घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.