नवजात स्त्री अर्भकाला इमारतीवरून फेकले?

अंबरनाथमधील धक्कादायक घटना

अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिमेच्या शंकर हाइट्स या इमारतीवरून एका नवजात स्त्री अर्भकाला फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बाळ इमारतीच्या डकमध्ये आढळल्यानंतर पोलिसांना याबद्दल कळवण्यात आले. दोन महिलांवर या प्रकरणी संशय असून, त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान हे बाळ कुमारी मातेचे होते का? यासंदर्भात सध्या तपास सुरु आहे.

रात्रीच्या सुमारास हे स्त्री अर्भक जन्माला आले असून त्याला तिथून फेकून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सकाळी इमारतीमधील रहिवाशांना हे बाळ इमारतीच्या डकमध्ये दिसले. त्यांनी स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांना याची माहिती दिली. उमेश पाटील यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी हे बाळ ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना चौकशीसाठी ताब्यातदेखील घेतले आहे. हे कृत्य कोणी केले, स्त्री जातीचे अर्भक अविवाहित मातेचे होते का? त्याला इमारतीवरून फेकले गेले की आणखी काही, यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत.