कल्याण: कल्याण शहर वाहतूक शाखेने धुलीवंदनाच्या दिवशी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १९४ वाहन चालक, ५९ मद्यपी वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उचलल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मद्यपी वाहन चालकांचे धाबे दणाणले आहे.
कल्याण-डोंबिवली विभागात वाहतूक शहर शाखेतर्फे धुलीवंदनाच्या दिवशी ५९ मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई करण्यात येऊन कल्याण शहर वाहतूक शाखेकडील २४ मद्यपी वाहन चालक, कोळसेवाडी वाहतूक शाखेच्या कारवाईत २५ मद्यपी वाहन चालक आणि डोंबिवली वाहतूक शाखेच्या कारवाईत १० मद्यपी असे एकूण ५९ मद्यपी वाहन चालकांवर मोटर वाहन कायदा कलम १८५ व १८८ अन्वय कारवाई करण्यात आली.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत हेल्मेटचा वापर न करणाऱ्या १२५ वाहनांवर तसेच दुचाकीवरुन ट्रिपल सीटने प्रवास करणाऱ्या ६९ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
५९ मद्यपी वाहनचालकांपैकी एकूण ११ जणांना मा. न्यायालय कल्याण कोर्ट येथे हजर केले असता मा. न्यायालयाने प्रत्येकी दहा हजार रुपये दंड असा एकूण एक लाख दहा हजार दंड व इतर पाच जणांकडे लायसन नसल्यामुळे प्रत्येकी पाच हजार दंड अतिरिक्त 25 हजार असे एकूण एक लाख 35 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे व तीन महिन्याकरता ड्रायव्हिंग लायसन रद्द केलेले आहे.
मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असे अवाहन कल्याण शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तिरडे यांनी केले आहे.