धावत्या रिक्षेवर झाड कोसळून जखमी रिक्षाचालकाचा मृत्यू

डोंबिवली : एमआयडीसीत काल गुरुवारी दुपारी एक गुलमोहराचे झाड धावत्या रिक्षेवर कोसळले. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. जखमी रिक्षा चालकाला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर येत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रामदिन लोधी (६०) असे रिक्षा चालकाचे नाव आहे. डोंबिवलीजवळील कोळे गावात ते रिक्षाचालक राहत होते. गुरुवारी दुपारी लोधी एमआयडीसी भागातून रिक्षा घेऊन जात होते. दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेले जुने गुलमोहराचे झाड लागलीच रामदिन लोधी यांच्या रिक्षेवर कोसळले. त्या झाडाखाली रिक्षा पूर्णपणे चेपक्याने रिक्षा चालक अडकले त्यांनी आरडा-ओरडा करताच लोकांनी रिक्षासह अडकलेल्या जखमी लोधीना बाहेर काढले. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. रिक्षा चालक लोधी डोंबिवली रेल्वे स्थानक ते एमआयडीसी, कोळेगाव, काटई परिसरात रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करीत असत.