भिवंडी: गाई, म्हशींचे दूध पाणावण्यासाठी तीन जणांनी आपसात संगनमत करून ऑक्सीटोसीन औषधे अवैधपणे विक्रीसाठी बाळगल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील किडवाईनगरमधून समोर आला आहे.
या प्रकरणी तीन जणांच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांची कुणकुण लागताच त्यांचा एक साथीदार घटनास्थळावरून फरार झाला आहे.
सैफूल माजीद सनफुर्द (२७), अशिक सरदार (२४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. लियाकत शेठ असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिघेही मूळचे पश्चिम बंगालचे असून ते सद्यस्थितीत किडवाईनगरमधील टिचर कॉलनीजवळील जुबेरशेठच्या कारखान्याच्या गाळ्यात राहत आहेत.
तिघांनी आपसात संगनमताने राहत असलेल्या आरसीसी गाळ्यात गाई, म्हैशींचे दूध वाढवण्यासाठी संबंधित विभागाचा कुठल्याही प्रकारचा परवाना नसताना ऑक्सीटोसिन औषधाची विक्रीसाठी साठवणूक केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या ऑक्सीटोसीनचा डोस गाई, म्हैशीना दिल्यानंतर ते दूध मानवी आरोग्यास हानीकारक असून त्याचे सेवन केल्याने श्रवण कमजोरी, दृष्टीहिनता, पोटाचे आजार तर नवजात बाळांना कावीळ, गरोदर स्त्रीला रक्तस्त्राव व अनैसर्गिक गर्भपात, श्वसनाचे व त्वचारोग असे गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. ऑक्सीटॉसिन हे हार्मोन असून त्याचा वापर प्रसुती सुरळीत करण्यासाठी होत असून त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रिस्क्रीप्शन आणि रजिस्टर फार्मासिस्ट यांची परवानगी आवश्यक आहे. परंतु आरोपी तिघेही ऑक्सिटोसिनचा गैरवापर करून औषधी उत्पादक असल्याचे भासवून त्याची विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याकडून सात लाख २३ हजार रुपये किमतीचा रसायन मिश्रित ऑक्सिटोसिनचा साठा जप्त करण्यात आला आहे.
तिघांवरही ठाणे औषध निरीक्षक (कोकण विभाग) चे सहायक आयुक्त राजेश बनकर यांच्या फिर्यादीवरून २४ डिसेंबर रोजी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. त्यांचा फरार साथीदार लियाकत शेठ याचा शोध पोलिस घेत आहेत.