दिव्याच्या डंपिंगवर निसर्ग उद्यान आणि खेळाचे मैदान

दोन वर्षांनी होणार दिवा कचरामुक्त

ठाणे : कचरा ही समस्या नसून संपत्ती आहे याची प्रचिती खत आणि वीज निर्मितीच्या प्रकल्पांमुळे येणार असतानाच दिवेकरांना आणखी एक दिलासादायक बातमी मिळणार आहे. कचऱ्याचे डोंगर संपताच येथे विशाल निसर्ग उद्यान किंवा खेळाचे मैदान निर्माण करण्यात येणार आहे.

ठाणे शहरात दररोज ८०० मेट्रीक टन कचरा जमा होतो. या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी शहरात कुठेच जागा शिल्लक न राहिल्याने गेल्या १४ वर्षांपासून दिव्यातील साबेगाव येथील मोकळ्या भुखंडाचे डंपिंग ग्राऊड बनवले. अखेर एका तपानंतर दिव्याचे हे डंपिंग ग्राऊंडड अखेर बंद झाले आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार १६ जानेवारीपासून भंडार्ली येथे कचरा टाकण्यास सुरुवात झाली असून १ फेब्रुवारीपासून दिवा डंपिंगवर एकही कचर्‍याची गाडी जाणार नाही.
डंपिंग ग्राऊंड बंद झाले असले तरी दिवावासियांना खर्‍या अर्थाने कचरामुक्ती दोन वर्षाने मिळणार आहे.

दिवा डंपिंगवर साचलेल्या कचर्‍याचे विघटन करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ६० टक्के निधी मिळणार आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेनेही आराखडा बनवला आहे. त्याच्या निविदा प्रक्रीया सुरुवात झाली आहे. पुढील ३० दिवसांमध्ये याची निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर ४५ दिवसांनी निविदा प्रक्रीया पूर्ण करून कार्यादेश काढला जाईल. म्हणजे प्रत्यक्षात या वर्षीच मे महिन्यापर्यंत या कामालाही सुरुवात होईल. बायो मायनिंग प्रक्रियेद्धारे साचलेला कचरा उकरून त्यावर प्रक्रीया केली जाणार आहे. सुमारे दोन वर्षे हे काम चालेल. म्हणजे दोन वर्षाने दिव्यातील डंपिंगवर साचलेला कचरा पूर्णता मोकळा होईल.

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे पूर्वी असलेल्या डंपिंग ग्राऊंडवर निसर्ग उद्यान उभारण्यात आले आहे. त्यांनी त्याला बायो कॅपिंग केले.  म्हणजे कचरा पूर्णपणे झाकून त्यावर उद्यान निर्मिती केली आहे. पण ठाणे महापालिका तसे करणार नसून संपूर्ण भुखंड कचरामुक्त करून त्याचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी आरक्षण बदलाची प्रक्रीया आधीच पार पाडण्यात आली आहे. त्यामुळे ज्या भुखंडावर १४ वर्षे कचर्‍याचा डोंगर होता त्याच ठिकाणी भविष्यात दिवावासियांना खेळाचे मैदान, निसर्ग उद्यान मिळणार असून खर्‍या अर्थाने दिवेकर मोकळा श्वास घेणार आहेत.