ठाणे झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाचपाखाडी येथील झोपडीधारकांना हक्काची घरे

ठाणे: झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीबांना मोफत हक्काची घरे देण्याचे स्वप्न स्वर्गीय बाळासाहेब आणि दिघे साहेब यांनी पाहिले होते, त्याची पूर्तता करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पाचपाखाडी येथिल झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरांच्या चावी वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. समरीन ग्रुप ऑफ कंपनी विकासक असलेल्या श्री जगन्नाथ गृहनिर्माण हाऊसिंग योजना ही विकासक मुस्ताक शेख यांनी दिलेल्या वेळेत पूर्ण केल्याबद्दल विकासकाचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कौतुक केले. या योजनेतील ४०० झोपडीधारक आणि १०० गाळेधारकांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करण्यात आले.

या योजनेचे भूमिपूजन माझ्या हस्ते २०१९ साली झाले होते. त्यावेळी विकासक श्री. शेख यांना नफा कमी मिळावा परंतु गरिबांना चांगल्या दर्जाची, सर्व सुखसोयी असणारी घरे द्या, अशी सूचना केली होती. त्यांनी ती पूर्ण केली. ठाणे आणि महाराष्ट्र झोपडपट्टीमुक्त व्हावा असे बाळासाहेब आणि दिघे साहेब यांचे स्वप्न होते, ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार काम करत आहे. झोपडपट्टी प्राधिकरण मुंबई येथे होते, ते एकत्र असल्याने मंजुरी मिळविण्यात उशिर होत होता, म्हणून एमएमआरडीए या विभागाकरिता वेगळे प्राधिकरण तयार करून त्याचे कार्यालय ठाण्यात सुरु करण्यात आले आहे. त्याचा फायदा ठाण्यातील झोपडपट्टी धारकांना होणार आहे. त्याचबरोबर धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या हक्काची घरे मिळावीत म्हणून क्लस्टर योजना मंजूर केली. या योजनेतून दहा हजार घरांचे काम सुरु आहे.
झोपडपट्टीवासींना मोफत घरे मिळावीत म्हणून कायद्यात-नियमात बदल केले, त्यामुळे गरिबांच्या योजना लवकर मंजूर केल्या जात असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

या कार्यक्रमाला आ. प्रताप सरनाईक, आ. निरंजन डावखरे, रविंद्र फाटक, शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, माजी नगरसेवक नारायण पवार, राजेश मोरे, महेश कदम, कार्यकारी अभियंता नितीन पवार, राजकुमार पवार यांच्यासह श्री जगन्नाथ गृह निर्माण संस्थेचे पदाधिकारी सदस्य, उपस्थित होते.