ठाणे-पालघरमध्ये मतदारांचा उत्साह
ठाणे: राज्यातील 2359 ग्रामपंचायतींच्या नव्या कारभारींची निवड करण्यासाठी आज मतदान पार पडले. ठाणे जिल्ह्यातील १२१ तर पालघर जिल्ह्यातील १०० ग्रामपंचायतींमध्ये मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. सोमवारी मतमोजणी असून विजयाचा गुलाल कोण उधळणार याची उत्कंठा राजकीय वर्तुळात आहे.
ठाणे जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ४८ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झाले. भिवंडी तालुक्यातील १३, शहापूर १६ तर मुरबाड तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झाले. सकाळी साडेसात ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ७२.८३ टक्के मतदान झाले. एकूण १८३ मतदान केंद्रांवर हे मतदान झाले. भिवंडी तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींमध्ये ४३,७६५ मतदार असून ३०,४९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शहापूर तालुक्यातील ३६,५३३ मतदारांपैकी २६,६५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर मुरबाड तालुक्यातील १३,६०६ मतदारांपैकी ११,२३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ६८.५९टक्के मतदान झाले.
पालघर जिल्ह्यात 100 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या असून यामध्ये 51 सार्वत्रिक तर 49 ग्रामपंचायतींमध्ये पोट निवडणुकीसाठी मतदान पार पडले. आहे. 628 जागांसाठी तब्बल 2099 इतके उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील टेंभी खोडावे ही ग्रामपंचायत सरपंचासह बिनविरोध झाली आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या तुरळक घटना वगळता शांततेत मतदान पार पडले. काही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका या बिनविरोध पार पडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांत उभी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे.