Thanevaibhav Online
16 September 2023
कंत्राटी वाहकांचे काम बंद
ठाणे : शुक्रवारी सकाळी अचानक ठाणे महापालिका परिवहन सेवेतील कंत्राटी वाहकांनी काम बंद आंदोलन पुकारले. महागाईच्या काळात ठोक मानधन मिळावे, ही त्यांची प्रमुख मागणी असून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलनकर्त्या वाहकांनी दिला आहे.
प्रवाशांना वेठीस धरायचं नाही, पण आमच्या मागण्या मान्य झाल्यावर तातडीने कामावर हजर होऊ असेही त्या वाहकांचे म्हणणे आहे. घोडबंदर रोडवरील आनंदनगर आगार येथे पुकारलेल्या आंदोलनात २३५ पुरुष तर १२५ महिला वाहकांनी सहभाग घेतला.
शुक्रवारी सकाळी तीन वाजल्यापासून ठाणे परिवहन सेवेतील कंत्राटी वाहकांच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. त्यामुळे परिवहन बस सेवेवर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झाला आहे. रोख पगार मिळावा त्याचप्रमाणे इतर मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी अनेक वर्षांचा पाठपुरावा करून देखील आम्हाला तो पगार थेट मिळत नसल्याने आम्ही हे आंदोलन करत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.