अधिकाऱ्यांच्या स्टेटसवर राजकीय पुढाऱ्यांची छायाचित्रे
राजीनामे देऊन राजकारण करा-शानू पठाण
ठाणे: शासकीय तथा निमशासकीय कर्मचाऱ्यांनी निष्पक्ष असावे, असे संकेत आहेत. मात्र, ठाणे महानगर पालिकेचे काही अधिकारी राजकीय पुढाऱ्यांचे फोटो आपल्या स्टेटसवर ठेवत आहेत. त्यामुळे हे अधिकारी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत का? असा सवाल विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केला. बुधवारी झालेल्या ठाणे महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या सुरूवातीलाच शानू पठाण यांनी या विषयाकडे लक्ष वेधले.
पठाण म्हणाले, ठामपाचे अधिकारी हे सबंध शहराशी संलग्न आहेत. ते कोण्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. मात्र, अधिकारीच जर राजकीय नेत्यांचे फोटो स्टेटसला ठेवत असतील तर नागरिकांना किंवा इतर पक्षाच्या लोकांना ते न्याय कसा देणार? , असे म्हणत याबाबत महापौर आणि आयुक्तांनी निर्देश द्यावेत किंवा संबधित अधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन राजकीय पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवावी, असा टोला पठाण यांनी लगावला. तसेच, पुढील महासभेत या अधिकाऱ्यांच्या राजकीय संबंधांचा पर्दाफाश करू, असा इशाराही पठाण यांनी दिला.