नवी मुंबई : ऐरोली येथील नवी मुंबई अग्निशमन दलाची इमारत आणि कर्मचारी वसाहत नव्याने उभारण्यात आली आहे. या इमारतीचे संपूर्ण काम झाले असून विद्युत कामाची चाचणी सुरू आहे. त्यामुळे ही चाचणी पूर्ण होताच ही इमारत सुरू करण्यात येणार असल्याने अग्निशमन कर्मचाऱ्यांना चांगली घरे मिळणार आहेत.
नवी मुंबई महानगर पालिकेचे ऐरोली येथील अग्निशमन कार्यालय हे सिडकोकालीन इमारतीमध्ये सुरू आहे. ही इमारत अत्यंत जीर्ण होऊन ती धोकादायक झाली होती. हीच परिस्थिती शेजारी असलेल्या कर्मचारी वसाहतीची देखील होती. त्यामुळे ही इमारत तोडून त्या जागी १५ कोटी खर्च करून आधुनिक सुसज्ज अशी इमारत बांधण्याचा निर्णय पालिकेच्या वतीने २०१८ साली घेण्यात आला होता. यानुसार मार्च २०१९मध्ये हे काम सुरू होणे अपेक्षित होते आणि मार्च २०२१पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काम सुरू करण्यासाठी या ठिकाणी असलेली कर्मचारी वसाहत पाडावी लागणार होती. त्यासाठी ती रिकामी करून मिळणे गरजेचे होते. मात्र काम सुरू करण्याची तारीख निघून गेली तरी कर्मचाऱ्यांनी ही वसाहत रिकामी केली नव्हती. मुलांची परीक्षा, उन्हाळी सुट्ट्या, अशी कारणे पुढे केली जात असल्याने हे काम रखडले होते. मात्र तीन ते चार महिन्यांनंतर जुनी इमारत रिकामी झाल्या नंतर या ठिकाणी बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा झाला.त्यामुळे आता ही इमारत पूर्ण बांधून तयार झाली आहे.
सध्या शेवटच्या टप्प्यात विद्युत विभागाने केलेल्या कामाची चाचणी अंतिम टप्पात आहे. ही चाचणी पूर्ण होताच इमारत नोव्हेंबर अखेर खुली करण्यात येणार आहे. अग्निशमन कर्मचाऱ्यांना चांगली घरे मिळणार आहेत.
ऐरोली येथील अग्निशमन दलाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून रंगरंगोटी देखील करण्यात आली आहे. आता फक्त विद्युत विभागाने केलेल्या कामाची चाचणी सुरू आहे. ती पूर्ण होताच ही इमारत अग्नीशमन कर्मचाऱ्यांना खुली होणार आहे, अशी माहिती उप अभियंता संतोष शीकतोडे यांनी दिली.