ठाणे : ठाणे महापालिकेतील टेंडर प्रक्रियेवरून सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक आणि कार्यकारी अभियंता यांच्यातील वाद चिघळला आहे. ‘चोर’ आणि ‘भ्रष्ट अधिकारी’ असा उल्लेख केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी ११ वाजता ठाणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केले. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नगरसेवकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त केल्यानंतर अखेर दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले.
ठाणे महापालिकेतील टेंडर प्रक्रियेवरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद आता थेट महापालिका प्रशासनाच्या कामकाजावर उमटले आहेत. नगरसेवक राजेंद्र फाटक यांनी कार्यकारी अभियंता रणधीर राणे यांच्यावर मागिल आठवड्यात केलेल्या गंभीर आरोपांचा आणि ‘चोर’, ‘भ्रष्ट अधिकारी’ अशा केलेल्या उल्लेखाचा निषेध करत महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज सकाळी एकजूटीनेच लेखणी बंद आंदोलन सुरू केले.
रणधीर राणे हे ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीतील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी टेंडर प्रक्रियेवरून राणे आणि शिवसेना नगरसेवक राजेंद्र फाटक यांच्यात तीव्र वाद झाला होता. महापालिकेच्या सर्व साधारण सभेत टेंडरला विरोध झालेला असतानाही प्रशासनाने टेंडर खुले केल्याने फाटक आक्रमक झाले होते. या टेंडर प्रक्रियेत ‘मॅच फिक्सिंग’ किंवा भागीदारी झाल्याचा थेट आरोप फाटक यांनी नगर अभियंता आणि कार्यकारी अभियंता रणधीर राणे यांच्यावर केला होता. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. फाटक यांनी केलेले सर्व आरोप राणे यांनी फेटाळून लावत नियमानुसार कामकाज केल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, फाटक यांनी कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांवर हल्लाबोल केला होता.
पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी ११ वाजता सार्वजनिक बांधकाम विभागासह महापालिकेच्या विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी खा. नरेश म्हस्के, सभागृह नेते हणमंत जगदाळे, गटनेते पवन कदम आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यामध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नगरसेवकाने गैरवर्तन केल्याबद्दल नाराजी व्यक्त करून त्याच्या वतीने अधिकारी कर्मचाऱ्यांची माफी मागितली तसेच खा.म्हस्के यांनी देखिल यापुढे असे गैरवर्तन कोणीही करणार नाही असे आश्वासन अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून या घटनेतून मार्ग काढू दोन दिवसांत अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या प्रकरणी आपली भूमिका मांडण्याचा निर्णय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतला असून तशी वेळ देखिल उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.