नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी फळ मार्केटमधील किराणा बाजार व दुकाने मंडळाच्या कार्यालयात माथाडी कामगाराच्या रजिस्टर पावतीवर सही करण्यासाठी ५५ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ४३ हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणात लोकसेवक भरत कदम (५६), कार्मिक प्रभारी निरीक्षक आणि खासगी सुरक्षा रक्षक विजय पवार (३२) यांचा समावेश आहे. तक्रारदाराने माथाडी कामगार म्हणून नियुक्तीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर पावतीवर सही करून देण्यासाठी पवार यांनी स्वतःसाठी पाच हजार आणि कदम यांच्यासाठी ५० हजार, अशी एकूण ५५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. ५ ऑक्टोबर रोजी एसीबीने मागणीची पडताळणी केली असता तडजोडीनंतर ४३ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. सायंकाळी ६.४७ वाजता कार्यालयातील केबिनमध्ये पंचासमक्ष ४३ हजार रुपये स्वीकारताना दोघांना एसीबी पथकाने ताब्यात घेतले.
या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक निता भासेले असून पर्यवेक्षक अधिकारी धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.