माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून सांत्वन
ठाणे : शिवसेना उबाठा गटाचे विभागप्रमुख दिवंगत प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबियांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोचविण्यात येतील, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे व्यक्त केली. या प्रकरणातील सर्व आरोपी कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत, असा विश्वासही कपिल पाटील यांनी व्यक्त केला.
मानपाडा येथे प्रदीप पुर्णेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज सायंकाळी पुर्णेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच त्यांच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर ते पत्रकारांबरोबर बोलत होते.
पुर्णेकर यांच्या कुटुंबियांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोचविण्यात येतील. या प्रकरणात पोलिस कारवाई सुरू असून, फरारी आरोपींसह सर्व आरोपींना पोलिस लवकरच अटक करतील. कोणताही आरोपी कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही, असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला.