नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका पाणी पुरवठा विभागामार्फत मोरबे जलवाहिनीवर एकाच दिवशी सहा ठिकाणी कामे काढण्यात आली आहेत. त्यामुळे मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून बुधवारी पहाटे २ वाजेपर्यंत अस १६ तास मोरबे जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका पाणी पुरवठा विभागामार्फत मंगळवार ६ ऑक्टोबर २०२६ रोजी मोरबे जलवाहिनीवर कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यात भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील १३.५ एमएल क्षमतेच्या संपची वाहिनी विलग करण्यासाठी एमएस प्लेट बसवणे, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात नवीन मीटरिंग किओस्क बसवणे, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राजवळील २०५० मिमी व्यासाच्या मोरबे मुख्य जलवाहिनीवर फ्लो मीटर बसवणे, सीबीडी सेक्टर-७ येथील मोरबे मुख्य जलवाहिनीवर १८०० मि.मी. व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसवणे, वाशी येथील अरेन्जा सर्कलजवळ मोरबे मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या वितरण वाहिनीवर ७०० मि.मी. व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसवणे, महापेजवळ मोरबे मुख्य जलवाहिनीला जोडलेल्या वितरण वाहिनीवर ९०० मि.मी. व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसवणे आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे जलपुरवठा विषयक कामे पूर्ण करण्यासाठी, मुख्य जलवाहिनीद्वारे होणारा पाणीपुरवठा मंगळवार ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून बुधवार ७ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत, म्हणजेच एकूण १६ तासांच्या कालावधीसाठी बंद राहील.
या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या भागांमधील पाणीपुरवठा विस्कळीत राहील. तसेच सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठे नोड्समधील पाणीपुरवठा देखील विस्कळीत राहील. काम झाल्यानंतर बुधवार ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळचा आणि संध्याकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने केला जाईल.
content here...