नवी मुंबई : पितृपक्षाला सुरुवात झाल्याने नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला बाजारात पारंपरिक भाज्यांसह केळीच्या पानांना मागणी वाढली आहे. श्राद्धविधी, पितरांना नैवेद्य तसेच महाप्रसादासाठी विशिष्ट भाज्यांचा वापर केला जात असल्याने या काळात नेहमीच्या भाज्यांपेक्षा पारंपरिक पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या भाज्यांच्या खरेदीला ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. त्यामुळे बाजारात संबंधित भाज्यांची उलाढालही वाढली आहे.
पितृपक्षात श्राद्धविधी करताना सात्त्विक भोजनाला विशेष महत्त्व दिले जाते. या भोजनासाठी दुधी भोपळा, लाल भोपळा, पडवळ, दोडका, शिराळी, कारले, सुरण, रताळे, बटाटा, गवार, भेंडी, अळू, मेथी, तांदुळजा, लिंबू आणि कोथिंबीर यांसारख्या भाज्यांना मागणी असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. काही ग्राहक श्राद्धाच्या दिवशी आवश्यक असलेल्या भाज्यांची खरेदी एकाचवेळी करत असल्याने सकाळच्या सत्रात भाजीपाला बाजारात गर्दी वाढताना दिसत आहे.
श्राद्धाच्या नैवेद्यासाठी केळीच्या पानावर भोजन वाढण्याची पारंपरिक पद्धत आजही अनेक कुटुंबांत पाळली जाते. त्यामुळे पितृपक्ष सुरू झाल्यापासून केळीच्या पानांची मागणी वाढली आहे. घरगुती श्राद्धविधीबरोबरच सामूहिक श्राद्ध, धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादासाठीही पानांची गरज भासत असल्याने विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.