अथर्व राणे आणि झेन मसानी याना रौप्य पदके
ठाणे : महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने मुंबई उपनगर जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे मालाड पश्चिम येथील अत्यंत मानाच्या गोरेगाव स्पोर्ट्स क्लबमध्ये २ ते ६ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ' मुंबई उपनगर अजिंक्यपद व निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत' ठाणे अकॅडमीच्या खेळाडूंनी देदीप्यमान कामगिरीची नोंद केली.
एकूण ३० क्रीडा प्रकारांमध्ये पार पडलेल्या आणि राज्यभरातील तब्बल ५३९ अव्वल खेळाडूंचा समावेश असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ठाण्याच्या खेळाडूंचे वर्चस्व विशेष लक्षवेधी ठरले. या संपूर्ण स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचा स्टार खेळाडू सोहम फाटक याने सुवर्ण पराक्रम गाजवत ऐतिहासिक तिहेरी मुकुट पटकावला. पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत अव्वल मानांकित सोहमने प्रतिस्पर्धी शुभम पाल याच्यावर सरशी साधत मानाचे सुवर्णपदक आपल्या नावे केले. एकेरीतील यशानंतर सोहमने पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात सुश्रुत कर्माकर याच्या साथीने द्वितीय मानांकित म्हणून खेळताना अव्वल मानांकित शुभम पाल व यश तिवारी जोडीवर मात करून दुसरे सुवर्णपदक जिंकले. या सोनेरी घोडदौडीची सांगता करताना मिश्र दुहेरीत अव्वल मानांकित सोहम फाटक याने मानसी कारेकर हिच्या साथीने शुभम पाल व मान्या अवलाणी या जोडीला चुरशीच्या सामन्यात नमवून तिसरे सुवर्णपदक संपादन केले. एकाच स्पर्धेत तीनही प्रमुख प्रकारांत विजेतेपद जिंकून सोहमने मिळवलेला हा तिहेरी मुकुट ठाण्याच्या क्रीडा विश्वातील अभूतपूर्व यश ठरला आहे.
याशिवाय अकॅडमीच्या इतर खेळाडूंनीही अंतिम फेरीत धडक मारत रौप्यपदकांची मोलाची कमाई केली. १७ वर्षांखालील मुलांच्या दुहेरी गटात अकॅडमीचा गुणवान खेळाडू झेन मसानी याने आर्यन पेडणेकरसह खेळताना अंतिम फेरीत कडवी झुंज दिली आणि उपविजेतेपदासह रौप्यपदक आपल्या नावावर केले. तसेच अथर्व राणे यानेही वैयक्तिक गटात चमकदार खेळाचे प्रदर्शन घडवून अंतिम फेरीपर्यंत धडक मारत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. अकॅडमीच्या या युवा शटलर्सच्या उत्तम खेळाने उपस्थितांची मने जिंकली.
ठाणे बॅडमिंटन अकॅडमीत मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजीरनिस, राजीव गणपुले, कबीर कंझारकर, एकेंद्र दर्जी, प्रसेनजीत शिरोडकर आणि फूलचंद पासी खेळाडूंच्या तांत्रिक कौशल्यावर, शारीरिक क्षमतेवर आणि कोर्टवरील एकाग्रतेवर अहोरात्र मेहनत घेत आहेत.