शेतकरी संतप्त; लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
शहापूर : राज्यातील खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमान, पीकस्थिती आणि दुष्काळाच्या विविध निकषांचा विचार करून शासनाने २५ सप्टेंबर रोजी राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ लागू केला आहे. या तालुक्यांना दुष्काळी परिस्थितीतील विविध सवलती व उपाययोजनांचा लाभ मिळणार आहे. मात्र ठाणे जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा या यादीत समावेश नसल्याने शहापूर-मुरबाडमधील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहापूर आणि मुरबाड हे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख कृषी तालुके असून विशेषतः शहापूर व मुरबाडची ओळखच ‘भाताचे कोठार’ अशी आहे. जिल्ह्याच्या उपलब्ध कृषी आकडेवारीत ठाणे जिल्ह्यातील पीक क्षेत्रात तृणधान्यांचा मोठा वाटा असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात निव्वळ पेरणी क्षेत्र सुमारे १.७६ लाख हेक्टर असून तृणधान्यांचे क्षेत्र सुमारे १.६१ लाख हेक्टर आहे. दरम्यान यंदाच्या खरीप हंगामात शहापूर-मुरबाड परिसरात सुरुवातीला पावसामुळे भात पेरणीला वेग आला. मात्र काही भागांत संततधार पावसामुळे दुबार पेरणीचे संकटही निर्माण झाले होते. त्यानंतर आता भात पीक पोगीच्या अवस्थेत येत असतांना सुमारे पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भाताच्या पोगीच्या काळात पाण्याची आवश्यकता असतांना पावसाचा खंड पडल्याने पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.अनेक ठिकाणी भात पिकाची वाढ खुंटण्याबरोबरच उत्पादनावर परिणाम देखील झाला आहे. त्यामुळे यंदाचे खरीप उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर होणार आहे.
शहापूर-मुरबाडसारख्या पावसाळी पट्ट्यांकडे केवळ वार्षिक पर्जन्यमानाच्या आकडेवारीतून पाहण्याऐवजी पावसाचे वितरण, पावसातील खंड, पिकांची अवस्था, जमिनीतील ओलावा, जलसाठ्यांची स्थिती आणि पुढील हंगामातील पाण्याची उपलब्धता यांचा एकत्रित विचार करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. कारण खरीप हंगामातील काही दिवसांचा पावसाचा खंडही भातासारख्या पावसावर अवलंबून असलेल्या पिकासाठी निर्णायक ठरू शकतो. सध्या भात पीक पोगीच्या अवस्थेत असतांना पाऊस लांबला तर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आगामी रब्बी अथवा उन्हाळी हंगामासाठीही पाण्याची उपलब्धता हा गंभीर प्रश्न ठरू शकतो. तथापि शहापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भातशेतीवर अवलंबून आहेत. तालुक्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत भात उत्पादनाला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे ज्या तालुक्याची शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे, त्या तालुक्यात पावसाचा दीर्घ खंड आणि पीकस्थिती बिघडत असताना दुष्काळाच्या निकषांमध्ये त्याचा विचार नेमका कसा केला गेला असा सवाल आता उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर मुरबाड तालुक्यात २०२५ मध्ये पीकनुकसान भरपाईशी संबंधित नोंदी उपलब्ध आहेत. यावरून या भागात हवामानाशी संबंधित शेतीचे नुकसान यापूर्वीही नोंदले गेले असल्याचे दिसते.
पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करा
माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची मागणी

ठाणे जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर भात व इतर पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यात ५० टक्के क्षेत्रावर निमगरवा, ४० टक्के क्षेत्रावर हळवा आणि उर्वरित क्षेत्रावर गरवा भाताची लागवड करण्यात आली आहे. भातपिकासाठी साधारण १५ ऑक्टोबरपर्यंत पावसाची आवश्यकता असते. मात्र, पाऊस न पडल्यामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात भाजीपाल्याचीही मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. पावसाअभावी भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे, असे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. राज्याचे कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनाही पत्राची प्रत पाठविली आहे.
यंदा पाऊस लवकर माघारी गेल्यामुळे आगामी रब्बी हंगामावरही परिणाम होणार आहे. यंदा जिल्ह्यात ६२५० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांचे नियोजन करण्यात आले होते. वाल, वाटाणा, हरभरा आणि गळीत धान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, या पिकांनाही पावसाचा फटका बसण्याची भीती आहे, याकडे कपिल पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
राज्य सरकारने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करताना, ठाणे जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश केलेला नाही. ठाणे जिल्ह्याचे नागरीकरण झाले असले, तरी भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शेती होते. या भागातील शेतकऱ्यांनाही दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. तरी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी केली आहे.