उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडणुकीत पक्षीय संख्याबळानुसार सात जागांपैकी भाजपच्या कोट्यात चार तर शिवसेनेच्या कोट्यात तीन स्वीकृत नगरसेवक येत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी भाजपच्या चारही उमेदवारांची निवड निश्चित मानली जात आहे.
मनपा सचिव कार्यालयात २२ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी व स्वीकृती प्रक्रिया पार पडली असून, येणाऱ्या २४ सप्टेंबर रोजी या निवडणुकीची औपचारिक प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण ७ जागांसाठी तब्बल ४१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. संख्याबळाच्या जोरावर भाजपच्या कोट्यातील चार जागांवर धनंजय बोडारे, बाळा श्रीखंडे, कपिल अडसूळ आणि प्रदीप रामचंदानी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पुरेसे संख्याबळ पाठीशी असल्याने या चारही नेत्यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड जवळपास निश्चित झाली आहे.
दुसऱ्या बाजूला शिवसेनेकडे तीन स्वीकृत नगरसेवकांचा कोटा उपलब्ध आहे. मात्र, शिवसेना, साई पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचा समावेश असलेल्या 'उल्हासनगर शहर विकास आघाडी'कडून अनेक इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. यात पंचम कालानी, मनोज लासी, तिरुपती रेड्डी, प्रमोद टाले, रमेश चव्हाण, आशा पवार, मनिषा भानुशाली, डॉ. प्रकाश नाथानी, रुपाली म्हस्के, किशोर वनवारी, अंकुश म्हस्के, रेशमा नवले, निलेश बोबडे, हेमा पिंजाणी, सुरेश सोनावणे, भरत गंगोत्री, राजकुमार शर्मा, सुरेंद्र सावंत, जीवन ईद्नानी, हरेश ईदनानी आणि जनक ईदनानी यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या तीन जागांवर पक्षश्रेष्ठी कोणाला संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत भाजपच्या हेमा पिंजानी यांनी घेतलेली भूमिका विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. पिंजानी यांनी यापूर्वी भाजपकडून उमेदवारी मिळवून नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपने स्वीकृत नगरसेवकांसाठी आपली अधिकृत यादी जाहीर करताना त्यांना डावलल्याने, त्यांनी ऐनवेळी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शिवसेना त्यांना आपल्या तीन जागांच्या कोट्यातून संधी देते का, याविषयी स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.