दोन महिने उलटले दुरुस्ती सुरूच, विद्यार्थ्यांचे हाल
कल्याण : कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेची भर पावसाळ्यात दुरुस्ती सुरू आहे. दीड ते दोन महिने उलटले तरी दुरुस्तीच्या नावाने शालेय इमारत ठेकेदाराने ताब्यात घेतली आहे. ना दुरुस्ती पूर्ण होत, ना शालेय इमारत ताब्यात मिळत. परिणामी पहिली ते आठवी पर्यंत वर्ग असणाऱ्या या शाळेतील विद्यार्थी मात्र बेहाल झाले आहेत.
मिळेल त्या जागेत बसून अध्ययन अध्यापन करताना विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. ना पिण्यास पाणी ना शौचालय सुविधा त्यामुळे गेले दीड महिना एकाच बौद्ध विहाराच्या समाजगृहात सर्व वर्ग एकत्र बसवून शिक्षण घेत आहेत. कल्याण तालुका पंचायत समितीचा कारभार म्हणजे 'आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय' या स्तरावरील आहे. तीच स्तिथी जिल्हा परिषद प्राथमिक विभागाची आहे. दीड महिना उलटला तरी एका शहरातील शाळेची ही स्थिती असेल तर ग्रामीण भागतील अवस्था काय असणार आहे. फक्त ठेकेदारीत मग्न असणारा शिक्षण विभाग ही बांधकाम खाते स्वतःकडे मिळाल्यामुळे टक्केवारीत मग्न झाला असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
याबाबत तालुका शिक्षण विभागाकडे विचारणा केली असता त्यांनी पिसवली शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे असे उत्तर देत हात झटकले. ३ ऑगस्ट पासून शाळेच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. १ ली ते ८ वी पट १२८ आहे. सध्या मुले बुद्धविहार समाज मंदिर पिसवली येथे बसत आहेत. या ठिकाणी शौचालय किंवा पाण्याची व्यवस्था नाही. मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे लवकरात लवकर शाळेची दुरुस्ती करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे.