ठाणे: भारतीय संस्कृती आणि संस्कृत भाषेच्या प्रसारासाठी कार्यरत असलेल्या प्राच्यविद्या अभ्यास संस्थेने विद्यार्थ्यांपर्यंत इतिहास, पुरातत्त्व आणि सांस्कृतिक वारसा पोहोचविण्यासाठी ‘प्राच्यविद्या अभ्यास संस्था तुमच्या दारी’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत संस्थेच्या संग्रहालयातील काही कलावस्तूंच्या प्रतिकृती तसेच ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या वस्तूंचा समावेश असलेली एक कलात्मक ‘ट्रंक म्युझियम’ (पेटारा संग्रहालय) तयार करण्यात आले आहे. हे चल संग्रहालय विद्यार्थ्यांच्या शाळांपर्यंत नेऊन त्यांना प्रत्यक्ष वस्तूंच्या माध्यमातून इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्राची ओळख करून देण्याचा संस्थेचा मानस आहे.
विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणे, त्यांच्या जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहन देणे आणि इतिहास व पुरातत्त्वशास्त्रासारख्या विषयांविषयी कुतूहल व रुची निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांना हे विषय सोप्या, मनोरंजक आणि प्रत्यक्ष अनुभवातून समजावून सांगण्याचा संस्थेचा प्रयत्न राहणार आहे.
ठाणे शहरातच इतिहास आणि सांस्कृतिक वारशाचा अभ्यास व अनुभव घेता येईल, अशा संस्था व संग्रहालये विद्यार्थ्यांना परिचित करून देण्याचाही या उपक्रमामागील उद्देश आहे. संस्थेच्या मते, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल.
या उपक्रमाची सुरुवात ठाणे महानगरपालिकेच्या शाळांपासून करण्याचा संस्थेचा मानस आहे आणि तशी विनंती संस्थेतर्फे आयुक्तांना आणि महापौरांना पत्र पाठवून करण्यात आली आहे. संबंधित शाळेत सुमारे एक तासाचा कालावधी या उपक्रमासाठी आवश्यक असून, शाळेने निश्चित केलेल्या तारखेला संस्थेची टीम ‘ट्रंक म्युझियम’ घेऊन शाळेत पोहोचेल. यावेळी विद्यार्थ्यांना संग्रहातील कलावस्तू, ऐतिहासिक वस्तू आणि त्यांच्या संदर्भाविषयी माहिती देण्यात येणार आहे.
‘प्राच्यविद्या अभ्यास संस्था तुमच्या दारी’ या उपक्रमातून संग्रहालय आणि ऐतिहासिक वारसा विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा अभिनव प्रयत्न होत असून, इतिहास व पुरातत्त्वाच्या अभ्यासाला शालेय स्तरावर अधिक रंजक आणि अनुभवाधारित स्वरूप देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.