विजांचा कडकडाट, शेकडो पक्ष्यांचा बळी
शहापूर : शहापूर तालुक्यात बुधवारी संध्याकाळपासून विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा तडाखा आणि तुफान पावसाने जनजीवन विस्कळीत केले. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक भागांत झाडे उन्मळून पडली असून विद्युत तारा तुटल्याने वीजपुरवठाही बाधित झाला आहे. या वादळात पंचायत समिती आवारात तसेच इतर ठिकाणी शेकडो पक्ष्यांचा बळी गेल्याची घटना समोर आली आहे. या चक्रीवादळाने तालुक्यातील शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानाची तत्काळ दखल घेऊन प्रशासनाने पंचनामे करावेत, अशी मागणी भाजपचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली आहे.
शहापूर पंचायत समितीच्या आवारात वादळी वाऱ्यामुळे झाडे थेट विद्युत तारांवर कोसळल्याने मोठे नुकसान झाले. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. तथापि स्थानिक पोलीस प्रशासन, विद्युत कर्मचारी व जीवरक्षक टीमने तातडीने घटनास्थळी पोहोचून पडलेली झाडे व विद्युत तारा हटवून वीजपुरवठा सुरळीत केला. शहापूर शहरातील फॉरेस्ट ऑफिसजवळही तीन ते चार झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. शेलवली रस्त्यावर विद्युत तार तुटून पडल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता.
राहुल नगर परिसरात गारांचा पाऊस झाल्याने अनेक झाडे कोसळली असून काही इमारतींचे पत्रे उडून गेले आहेत. वादळी वाऱ्याचा जोर एवढा होता की, काही ठिकाणी घरांचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील विविध भागांत वादळामुळे नेमके किती नुकसान झाले, याचा आढावा घेण्याचे काम प्रशासनाकडून तातडीने हाती घेणे गरजेचे आहे. विशेषतः तुटलेल्या विद्युत तारा आणि रस्त्यावर कोसळलेली झाडे तातडीने हटवून नागरिकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यात पोलीस प्रशासन, विद्युत मंडळाचे कर्मचारी व जीवरक्षक टीमच्या सदस्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. वादळामुळे मृत्युमुखी पडलेल्या शेकडो पक्ष्यांच्या घटनेने पर्यावरणप्रेमींमध्येही हळहळ व्यक्त होत असून वनविभागाने या घटनेची दखल घेऊन पाहणी करावी अशी मागणी होत आहे.
शहापूर मतदारसंघाचे माजी आमदार तथा जनसेवक पांडुरंग बरोरा यांनी अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे शेतकरी तसेच गरीब जनतेचे झालेल्या नुकसानीची तातडीने दखल घेतली. त्यांनी तहसीलदारांना पत्र देऊन नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करून शासनाकडून योग्य ती नुकसानभरपाई व मदत मिळावी, अशी मागणी करत प्रशासनाकडे जनतेची बाजू ठामपणे मांडली.