ठाणे : ‘व्होट चोरी’च्या आरोपांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे केल्याचा आरोप करत काँग्रेसने सोमवारी ठाण्यात रणशिंग फुंकले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेल्या आंदोलनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. यावेळी त्यांच्या नावाने प्रतीकात्मक उठाबशा काढून निषेध नोंदवण्यात आला, तसेच त्यांच्या राजीनाम्यासह बडतर्फीची मागणी करण्यात आली.
मतदार याद्यांमधील कथित फेरफार, मतदारांची नावे वगळणे आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून काँग्रेसने निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. मतदारांचा मूलभूत अधिकार कोणत्याही प्रकारच्या मनमानीमुळे हिरावून घेतला जाऊ नये, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेश शर्मा आणि प्रदेश सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनाला माजी खासदार कुमार केतकर प्रमुख उपस्थित होते. आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मतदारांची नावे हेतुपुरस्सर वगळल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई, बडतर्फी तसेच अटकेची मागणी निवेदनातून करण्यात आली.
या आंदोलनात ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे, ठाणे काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष चेतनसिंग पवार, भिवंडी शहर अध्यक्ष अबिद खान, कल्याण शहर अध्यक्ष नवीन सिंग, डोंबिवली शहर अध्यक्ष अमित म्हात्रे, मिरा-भाईंदर अध्यक्ष राकेश राज पुरोहित, उल्हासनगर अध्यक्ष रोहित साळवे, माजी जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह प्रदेश पदाधिकारी, प्रदेश सदस्य, ब्लॉक अध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी आणि सर्व स्तरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.