बदलापूर : अखेरचे अंत्यसंस्कार अंधारात आणि गैरसोयीत पार पाडण्याची वेळ बदलापुरातील सोनिवली ग्रामस्थांवर आली आहे.
उल्हास नदीच्या काठावर असलेल्या सोनिवलीच्या पारंपरिक स्मशानभूमीत विजेची कोणतीही व्यवस्था नसल्याने, मंगळवारी रात्री एका ग्रामस्थाच्या अंत्यसंस्कारासाठी चारचाकी वाहनाच्या दिव्यांचा आधार घ्यावा लागला. जवळच्या व्यक्तीला निरोप देताना कुटुंबीयांना अंधाराशी झुंज द्यावी लागली. या घटनेचे छायाचित्र आणि चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारीत झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
प्रशासकीय काळात या स्मशानभूमीच्या नूतनीकरणासाठी सुमारे ५० लाखांहून अधिक रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. कॉंक्रीटची नवीन आणि पक्की स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र दुर्दैवाने वर्ष उलटूनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. रस्ता दुरुस्ती, ग्रामस्थांच्या काही सूचना आणि लोकप्रतिनिधींनी सुचवलेले बदल, अशा तांत्रिक कारणांमुळे हे महत्त्वाचे काम रखडल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.