संगीताची आवड मुळात लहानपणापासून होती, घरातच संगीताची परंपरा असल्याने संगीत ऐकत व शिकतच प्राजक्ता मराठे लहानाच्या मोठ्या झाल्या. आजोबा संगीतभूषण स्व. पं. राम मराठे यांच्यापासून लाभलेली संगीत परंपरा जोपासायचे कार्य प्राजक्ता मराठे करत आहेत. आजोबांच्या गायकीचे संगीत संस्कार प्राजक्ता यांना त्यांचे वडील ज्येष्ठ गायक, हार्मोनियम वादक स्व. संजय मराठे व काका पं. मुकुंद मराठे यांच्याकडून मिळाले. घरात संगीताचे संस्कार असल्याने संगीताबद्दलची ओढ लहानपणापासूनच त्यांना होती. वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षापासूनच त्यांनी गायनाला सुरुवात केली. तेव्हापासूनच घरातील संगीताचा वसा त्यांनी कायम ठेवला आहे. सध्या त्या गायकी अंगाने संगीत शिकवण्यासोबत शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करतात. चांगले शिष्य घडावेत, जास्तीत जास्त तरुण पिढीपर्यंत शास्त्रीय संगीत पोहोचावे यासाठी त्या कार्यशील असतात. गाण्यातून केवळ शैक्षणिक फायदा मिळावा, संगीताची पदवी मिळावी यासाठी संगीत शिकणारे शिष्य न घडवता खरोखरच संगीत क्षेत्रात अभ्यास आणि कार्य करायचे आहे असे शिष्य घडवण्यावर त्यांचा भर असतो. त्या गुरुकुल पद्धतीवर आधारित संगीताचे शिक्षण देतात. संगीतामुळे व्यक्तिमत्वात बदल जाणवतो, शास्त्रीय संगीतातील स्वरांमध्ये थेट देवाशी कनेक्ट करायची ताकद असते. स्वरांना देव मानून गुरूंनी सांगितलेल्या रस्त्याने चालणे शास्त्रीय संगीताचा अभ्यास करताना महत्त्वाचे असते व माझ्यासाठी माझ्या घराण्याची गायकी पुढे नेणे महत्त्वाचे आहे, असे त्या सांगतात. वडील व काकांनी रुजवलेली आजोबा अर्थात स्व. संगीतभूषण पं. राम मराठे यांची गायकी पुढे नेण्याचे कार्य प्राजक्ता मराठे व त्यांची भावंड करत आहेत. वडील ज्येष्ठ गायक, हार्मोनियम वादक स्व. संजय राम मराठे हे प्राजक्ता मराठे यांचे गुरु आहेत. एकाच वेळी शिष्या व मुलीची भूमिका प्राजक्ता मराठे यांनी निभावली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यांच्यामुळेच प्राजक्ता या स्वरांवर प्रेम करायला शिकल्या. फक्त उत्तम कलाकार असून चालत नाही तर चांगला माणूस असणे महत्त्वाचे आहे ही शिकवण त्यांना त्यांच्या बाबांनी दिली. फक्त परीक्षांवर, वाढीव गुणांवर व पदवी मिळावी यासाठी संगीत शिकल्यास रागांची, स्वरांची खोली कळत नाही, असे प्राजक्ता मराठे यांचे मत आहे. शास्त्रीय संगीत कंटाळवाणे नसून रसिक प्रेक्षकांसमोर जर संगीतात कोणत्याही प्रकारे भेसळ न करता, घरंदाज गायकी सादर केली तर प्रेक्षक कौतुकच करतात, याचा उत्तम नमुना म्हणजे प्राजक्ता मराठे यांची गायकी. स्व. संगीतभूषण पं. राम मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांनी त्यांचे संगीत मंदारमाला हे संगीत नाटक रंगमंचावर आणले आहे. या संगीत नाटकाला रसिकांसोबत तरुणाईचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पुण्यातील सवाई गंधर्वमध्ये मागील वर्षी त्यांनी सादरीकरण केले. कालजई २०२४ मध्येही त्यांनी सहभाग घेतला होता.
GENERAL
संगीत कला मनातून रुजवणे महत्वाचे- प्राजक्ता मराठ
संगीत कला मनातून रुजवणे महत्वाचे- प्राजक्ता मराठ
फोटो: ठाणे वैभव
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475