१६ सहायक पोलीस आयुक्तांसह ४,६०० हून अधिक पोलीस अधिकारी-कर्मचारी तैनात
ठाणे: नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कंबर कसली आहे. शहरातील मंदिरांपासून ते सार्वजनिक मंडळांपर्यंत आणि गर्दीच्या ठिकाणांपासून ते वाहतूक व्यवस्थेवर कडक नजर ठेवण्यासाठी १६ सहायक पोलीस आयुक्तांसह ४,६०० हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यामध्ये एक हजार होमगार्डचा समावेश आहे
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पाच परिमंडळात यंदा नवरात्रोत्सवानिमित्त सार्वजनिक आणि खासगी मिळून एकूण ४,०१६ दुर्गादेवी मूर्तींची स्थापना झाली आहे. यामध्ये ६३५ सार्वजनिक, तर ३,३८१ खासगी मूर्तींचा समावेश आहे. याशिवाय सार्वजनिक आणि खासगी स्वरूपात घटस्थापना, फोटो-प्रतिमा, मंदिरांमधील धार्मिक कार्यक्रम आणि रामलीलेचे आयोजनही करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये आणि सार्वजनिक मंडपांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते. गरबा, दांडिया आणि अन्य धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे रात्री उशिरापर्यंत नागरिकांची वर्दळ सुरू असते. या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नयेत, तसेच महिलांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क राहणार आहे.
१६ सहाय्यक पोलीस आयुक्त, १०० पोलीस निरीक्षक, २९९ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, २९ महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक, २,५४५ पोलीस अंमलदार आणि ६५० महिला पोलीस अंमलदार असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याशिवाय एक हजार होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) दोन कंपन्यांची मदत घेण्यात येणार आहे.
नवरात्रोत्सवादरम्यान मंदिर परिसर, प्रमुख रस्ते आणि सार्वजनिक मंडपांच्या आसपास वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळणे, वाहनांची शिस्त राखणे आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका व अग्निशमन वाहनांना मार्ग उपलब्ध करून देणे, यावरही भर दिला जाणार आहे. उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.