नागरिकांचा झाडांना मिठी मारून विरोध
ठाणे : रिंग मेट्रो प्रकल्पासाठी होणारी अंदाधुंद वृक्षतोड तातडीने थांबवावी, या मागणीसाठी घोडबंदर मार्गावरील वाघबीळ येथील रहिवाशांनी रविवारी अनोखे ‘चिपको आंदोलन’ केले. हिरवे कपडे परिधान करून लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत शेकडो नागरिकांनी झाडांना मिठी मारत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आणि प्रकल्प रद्द करण्याची आक्रमक मागणी केली.
'ठाणे अगेन्स्ट इंटिग्रल रिंग मेट्रो' या नागरिक मंचाच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले. परिसरात सुरू झालेल्या वृक्षतोडीमुळे रिंग मेट्रो प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ठाण्यात आधीच वाहतूक कोंडी आणि हरित क्षेत्रांमध्ये घट अशा समस्या असताना मेट्रोसाठी झाडांची कत्तल का, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास मान्य नसल्याची भूमिका यावेळी नागरिकांनी मांडली. वृक्षतोडीविरोधात चिपको आंदोलन करण्याचा इशारा मंचाने यापूर्वीच दिला होता. त्यानुसार रविवारी नागरिकांनी झाडांना मिठी मारून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. आधीच तोडण्यात आलेल्या झाडांबद्दल आणि तोडीच्या धोक्यात असलेल्या वृक्षांबद्दल चिंता व्यक्त करत नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी एकजूट दाखवली.
अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोच्या प्रस्तावित मार्गाला ठाण्यातील विविध भागांतून विरोध होत आहे. गेल्या कित्येक आठवड्यांपासून दर रविवारी रहिवासी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत. पोखरण रस्ता क्रमांक दोन परिसरात मानवी साखळी करून नागरिकांनी प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. बॅरिस्टर नाथ पै मार्गावरील रहिवाशांनी मूक मोर्चा काढून मार्ग बदलण्याची मागणी केली. हिरानंदानी इस्टेट परिसरातही मानवी साखळीच्या माध्यमातून रहिवाशांनी आपली भूमिका मांडली होती. आता वाघबीळमध्ये वृक्षतोडीविरोधात चिपको आंदोलन झाल्याने या विरोधाला पर्यावरणाच्या मुद्द्याची जोड मिळाली आहे.
रिंग मेट्रोविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ॲड. राधिका राणे यांनी वृक्षतोडीबाबत चिंता व्यक्त केली. वाघबीळमध्ये सुरू झालेली वृक्षतोड हा प्रस्तावित प्रकल्पाचा चिंताजनक परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण आणि भावी पिढ्यांच्या जीवनमानाशी तडजोड करणाऱ्या प्रकल्पाला विकास म्हणता येणार नाही. हजारो झाडांचा बळी न देता ठाण्यासाठी अधिक चांगल्या आणि शाश्वत वाहतूक पर्यायांचा विचार करावा. त्यामुळे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान वयाच्या ८०व्या वर्षी टेंभी नाका परिसरातून वाघबीळ येथे आंदोलनात सहभागी झालेले आनंद चौबल यांनीही वृक्षसंवर्धनाची जबाबदारी प्रत्येक ठाणेकराची असल्याचे सांगितले. हा प्रश्न केवळ वाघबीळपुरता मर्यादित नसून संपूर्ण शहराच्या पर्यावरणाशी संबंधित आहे. आणखी वृक्षतोड होण्यापूर्वी प्रशासनाने नागरिकांचे म्हणणे ऐकून प्रकल्पाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.