मुदत संपूनही ६ महिने ठेकेदाराकडून रुग्णांना जेवण पुरवठा
ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
रुग्णाच्या जेवणात झुरळ सापडल्याच्या घटनेनंतर आता अन्न पुरवठ्याचा ठेकाच बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित ठेकेदाराचा करार तब्बल सहा महिन्यांपूर्वीच संपुष्टात आला असतानाही, कोणतीही नवीन मुदतवाढ किंवा कार्यादेश (वर्क ऑर्डर) नसताना रुग्णांना जेवण पुरवले जात असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.
काही दिवसांपूर्वी रुग्णालयातील एका रुग्णाच्या जेवणात झुरळ आढळल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली होती. मात्र, कारवाई करताना ठेकेदाराच्या परवान्याची व कराराची प्राथमिक खातरजमा एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केलीच नाही, असा दावा मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष (जनहित व विधी विभाग) स्वप्निल महिंद्रकर यांनी केला आहे. यामुळे एफडीए प्रशासनाच्या संशयास्पद भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नियमानुसार जुना करार संपण्यापूर्वी नवीन निविदा प्रक्रिया राबवून अधिकृत ठेकेदार नियुक्त करणे महापालिका व रुग्णालय प्रशासनावर बंधनकारक होते. मात्र, प्रशासकीय संमती आणि संगनमताशिवाय असा विना-कार्यादेश पुरवठा सहा महिने सुरू राहणे शक्यच नाही, असा आरोप करत महिंद्रकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची महापालिका आयुक्तांमार्फत सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.