घरांना तडे; पंचनामे होऊनही भरपाई नाही
शहापूर: तालुक्यातील डोळखांब महसूल मंडळांतर्गत टेंभुर्ली आणि मांजरे परिसरातील स्टोन क्रशर व दगडखाणींमध्ये होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे घरांना हादरे बसून भिंतींना तडे गेल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. तलाठी स्तरावर पंचनामे होऊनही नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा आरोप करत प्रशासन पुढील कारवाई कधी करणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
ब्लास्टिंगच्या वेळी घरांना तीव्र हादरे जाणवत असून भिंती, छताच्या जोडण्या आणि दरवाजांच्या चौकटींजवळ भेगा पडल्या आहेत. यामुळे घरांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. या प्रकरणी टेंभुर्ली येथील नागरिकांनी तलाठी रणदिवे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर संबंधित घरांचे पंचनामे करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र पंचनाम्यांनंतरही नुकसान भरपाई मिळाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. पंचनामे झाले मग पुढील कारवाई कुठे अडकली असा प्रश्न दमयंती चौधरी यांच्यासह ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. दरम्यान घरांना पडलेल्या तड्यांचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी स्वतंत्र तांत्रिक तपासणी व स्ट्रक्चरल ऑडिट करावे. तसेच संबंधित दगडखाणींमधील ब्लास्टिंगचे नियम, आवश्यक परवानग्या, सुरक्षित अंतर आणि कंपनांची नोंद यांची तपासणी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. महसूल विभाग, खनिकर्म विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संयुक्त पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी. दरम्यान ब्लास्टिंगमुळे नुकसान झाल्याचे सिद्ध झाल्यास जबाबदारी निश्चित करून नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून द्यावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.